अंबाजोगाई शहर ठरतेय कोरोना हॉटस्पॉट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:30 IST2021-04-05T04:30:01+5:302021-04-05T04:30:01+5:30
अंबाजोगाई : अंबाजोगाई तालुका कोरोनाचा हॉटस्पॉट ठरू पाहत आहे. गेल्या दोन दिवसांत रुग्णसंख्येने दररोज शंभराचा आकडा पार केला आहे. ...

अंबाजोगाई शहर ठरतेय कोरोना हॉटस्पॉट
अंबाजोगाई : अंबाजोगाई तालुका कोरोनाचा हॉटस्पॉट ठरू पाहत आहे. गेल्या दोन दिवसांत रुग्णसंख्येने दररोज शंभराचा आकडा पार केला आहे. एप्रिल महिन्याच्या चारच दिवसांत तालुक्यात कोरोनाचे ३०४ नवीन रुग्ण आढळून आले आहेत. अंबाजोगाई शहरासोबत ग्रामीण भागातही रुग्णसंख्या वाढू लागली आहे. शासनाने कडक निर्बंध लादूनही नागरिकांकडून सर्रास नियमांचे उल्लंघन सुरू असल्याने आगामी काळात स्थिती अजून गंभीर होते की काय, अशी स्थिती निर्माण झाली आहे.
अंबाजोगाई तालुक्यात मार्च महिन्यात कोरोनाबाधितांचा आकडा १ हजारांवर होता. मात्र त्यानंतरही बाधितांचा आकडा वाढतच चालला आहे. एप्रिलच्या चार दिवसांत ३०४ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. आतापर्यंत तालुक्यात चार हजारांपेक्षा जास्त व्यक्तींना कोरोनाची लागण झाली आहे. गेल्या नऊ महिन्यांत अंबाजोगाई तालुक्यात बाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली. तालुक्यात आजपर्यंत चार हजारांपेक्षा जास्त लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला, तर मार्चमध्ये ३१ दिवसांत एक हजारांपेक्षा अधिक नागरिकांना कोरोना झाली आहे. शहरात नवीन रुग्ण व सहवासीत रुग्णांच्या संख्येमध्ये दिवसेंदिवस भर पडत आहे. शहरातील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालय व लोखंडी सावरगाव येथील कोविड रुग्णालय हाऊसफुल्ल झाले आहे. तरीही रुग्णांची वाढती संख्या प्रशासनासमोर चिंता वाढवित आहे. अशा स्थितीतही शहरवासीयांना कोरोनाचे गांभीर्य नसल्याचे दिसत आहे. शहरात सार्वजनिक ठिकाणी अजूनही गर्दी कायम आहे. शासनाने बाजार बंद केले असले तरी रस्त्यावर बसणाऱ्या विक्रेत्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. हे विक्रेते कसल्याही प्रकारचे बंधन पाळत नसल्याने संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढतच चालला आहे. शासनाने विनामास्क फिरणाऱ्यांकडून हजारो रुपये दंड वसूल केला तरी परिस्थिती जैसे थेच होऊ लागली आहे.
ग्राहक, व्यापाऱ्यांचे मास्क वापराकडे दुर्लक्ष
----
अंबाजोगाई शहरात कोरोनाचे संक्रमण मोठ्या प्रमाणात वाढत चालले आहे. असे असतानाही प्रतिबंधात्मक उपाय म्हणून आवश्यक असलेल्या त्रिसूत्रीचे पालन व्यापारी व ग्राहकांकडून होत नाही. मास्कच्या वापराकडे कमालीचे दुर्लक्ष केले जात आहे. सोशल डिस्टन्सिंग पाळले जात नाही. शासनाने कोरोनाबाबतची त्रिसूत्री पालन करण्याबाबत सातत्याने आवाहन करूनही याकडे दुर्लक्ष केले जाते. कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन न करणाऱ्यांना कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल.
- शरद झाडके, उपजिल्हाधिकारी