कोरोना पुन्हा वाढताेय, एकाच दिवसात १८५ नवे रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:58 IST2021-03-13T04:58:18+5:302021-03-13T04:58:18+5:30
बीड : जिल्ह्यात कोरोनाचा धोका दिवसेंदिवस वाढत चालला आहे. मध्यंतरी कमी झालेला कोरोना पुन्हा डोके वर काढत असून, गुरुवारी ...

कोरोना पुन्हा वाढताेय, एकाच दिवसात १८५ नवे रुग्ण
बीड : जिल्ह्यात कोरोनाचा धोका दिवसेंदिवस वाढत चालला आहे. मध्यंतरी कमी झालेला कोरोना पुन्हा डोके वर काढत असून, गुरुवारी तब्बल १८५ नव्या रुग्णांची नोंद आरोग्य विभागाकडे झाली. बीड व अंबाजोगाई तालुक्यात सर्वाधिक रुग्ण आढळले. तसेच गुरुवारी दिवसभरात ७७ रुग्ण कोरोनामुक्त झाले. त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली.
जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. रोज रुग्णसंख्या शतकपार जात आहे. गुरुवारी दिवसभरात १४०७ संशयितांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. यातील १२२२ अहवाल निगेटिव्ह आले तर १८५ पॉझिटिव्ह आले. यात अंबाजोगाई तालुक्यात ४२, आष्टी १६, बीड ८५, धारूर १, गेवराई १२, केज ७, माजलगाव १३, परळी ५, शिरूर १, वडवणी ३ येथील रुग्णांचा समावेश आहे. तसेच गुरुवारी ७७ रुग्णांनी कोरोनावर मात केली. त्यांना रुग्णालयातून सुटी देऊन घरी पाठविण्यात आले. सुदैवाने गुरुवारी एकाही मृत्यूची नोंद आरोग्य विभागाकडे झाली नाही. आता एकूण बाधितांची संख्या १९ हजार ८२३ एवढी झाली आहे. पैकी १८ हजार ६७९ जण कोरोनामुक्त झाले असून ५८८ जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार, साथरोग अधिकारी डॉ.पी.के. पिंगळे यांनी ही माहिती दिली.
कोरोनामुक्तीचा टक्का घसरला
नव्या रुग्णांची संख्या वाढत असताना कोरोनामुक्तीचा टक्का घसरला आहे. आरोग्य विभाग, प्रशासनासाठी हा चिंतेचा विषय आहे. गत महिन्यात ९५ असणारा टक्का गुरुवारी ९४ वर आला होता. तसेच मृत्यूदर १३.१ टक्का आहे.