शिरूर तालुक्यात तीन दिवसांपासून कोरोनाचा चढता आलेख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:29 IST2021-04-05T04:29:54+5:302021-04-05T04:29:54+5:30
शिरूर कासार : तालुक्यात आतापर्यंत कोरोनाबाधिताचा एक अंकी आकडा असायचा. त्यात कधी निरंकदेखील, असे दिलासादायक चित्र दिसत होते. ...

शिरूर तालुक्यात तीन दिवसांपासून कोरोनाचा चढता आलेख
शिरूर कासार : तालुक्यात आतापर्यंत कोरोनाबाधिताचा एक अंकी आकडा असायचा. त्यात कधी निरंकदेखील, असे दिलासादायक चित्र दिसत होते. मात्र, शनिवारी बाधितांच्या आकड्याने दशक गाठले, तर मागील तीन दिवसांपासून चढता आलेख सुरू झाला. त्यात सोमवारीदेखील गोमळवाड्यातच सर्वाधिक बाधित रुग्ण निघाल्याने चिंतेत भर पडत आहे. त्यामुळे कटाक्षाने गर्दीत जाणे टाळावे, मास्कशिवाय तर बाहेर निघणे नकोच, अशी वेळ आली आहे.
जिल्हाभर कोरोनाबाधितांची संख्या वाढत असतानाही शिरूर तालुक्यात मात्र हा आकडा कमी असायचा. मात्र, शुक्रवारी आलेल्या अहवालानुसार ६ गावांत १० बाधित रुग्ण निघाले आहेत. त्यात ६ पुरुष, तर ४ महिलांचा समावेश होता. घोगस पारगाव ३, खोपटी २, टेंभुर्णी २, तर शिरूर, गोमळवाडा आणि डोळेवाडी या गावांत प्रत्येकी १, असा १० चा आकडा गाठला होता. चिंतेची बाब बनत असतानाच शनिवारी १२, तर रविवारी आलेल्या तपासणी अहवालात तालुक्यात १५ रुग्ण बाधित निघाले. यातदेखील गोमळवाड्यातच रुग्णसंख्या ७ असल्याने गोमळवाडा कोरोनाबाबत लाल रेषांकित होत आहे. शिरूरमध्ये २, गोमळवाडा ७, डोळेवाडी २, खोपटी १, बावी २ व विघनवाडीत १, असा १५ आकडा गाठला आहे.
कोरोनाबाधितांचा आकडा अल्प असे समजण्याची चूक करू नका. त्याची व्याप्ती अधिक गावांत असल्याने प्रत्येकाने किमान आपण आणि आपले कुटुंब सुरक्षित ठेवण्याचे गांभीर्य बाळगावे. न दिसणाऱ्या शत्रूबरोबरचा हा लढासुद्धा आपण घरीच बसून जिंकू शकतो, असे आवाहन तहसीलदार श्रीराम बेंडे व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अशोक गवळी यांनी केले आहे. गरज पडली तरच बाहेर जा, जाताना मास्क वापराच, असे आवाहन करण्यात आले.