बर्ड फ्लूमुळे आष्टी तालुक्यातील १२ गावात कंटेनमेंट झोन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:28 IST2021-01-13T05:28:45+5:302021-01-13T05:28:45+5:30
आष्टी : जिल्ह्यातील आष्टी पाटोद्याच्या सरहद्दीवर असलेल्या मुगगाव येथे पाच दिवसांत ३२ कावळ्यांचा मृत्यू झाल्यानंतर हे मृत्यू ...

बर्ड फ्लूमुळे आष्टी तालुक्यातील १२ गावात कंटेनमेंट झोन
आष्टी : जिल्ह्यातील आष्टी पाटोद्याच्या सरहद्दीवर असलेल्या मुगगाव येथे पाच दिवसांत ३२ कावळ्यांचा मृत्यू झाल्यानंतर हे मृत्यू बर्ड फ्यूने झाल्याचे प्रयोगशाळेतील अहवालावरून स्पष्ट झाले. त्यामुळे जिल्ह्यातील पाटोदा व आष्टी तालुक्यातील नऊ गावांमध्ये कुक्कुट पक्ष्यांच्या खरेदी- विक्री, जत्रा, प्रदर्शनांवर प्रतिबंध घालण्यात आला. तोच मंगळवारी सकाळी ब्रम्हगाव येथे २ कावळ्यांचा मृत्यू झाल्याची माहिती ग्रामसेवक देशमुख यांनी दिली. या कावळ्यांच्या मृत्यूचे कारण अहवाल आल्यानंतर स्पष्ट होणार आहे. दरम्यान, आष्टी तालुक्यात या रोगाची लागण होऊ नये म्हणून प्रशासनाने तातडीने हालचाली सुरू केल्या असून, तालुक्यातील १२ गावांना कंटेनमेंट झोन घोषित केले आहे.
पक्षी मृत झाल्यास परस्पर विल्हेवाट न लावता पशुसंवर्धन विभागास तात्काळ कळवावे, असे आवाहन पशुधन विकास अधिकारी मंगेश ढेरे यांनी केले आहे. या रोगाचा संसर्ग रोखण्यासाठी आष्टी तहसील कार्यालयात मंगळवारी तहसीलदार शारदा दळवी यांच्या नेतृत्वाखालील पशुवैद्यकीय अधिकारी व इतर वैद्यकीय अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत तालुक्यातील १२ गावांना कंटेनमेंट झोन घोषित केले असून, यामध्ये नागरिकांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. यात ब्रम्हगाव, कऱ्हेवाडी, पांगुळगव्हाण, कासेवाडी, आंबेवाडी, शेकापूर, देसूर, हाजीपूर, भाळवणी यासह शेजारील गावांचा समावेश आहे.
बर्ड फ्लूच्या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने आष्टी तालुक्यातील पांगुळगव्हाण व ब्रम्हगाव गावामध्ये कोंबड्या, अंड्यांची वाहतूक व खरेदी-विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी १२ गावांत कंटेनमेंट झोन घोषित करण्यात आला आहे. या परिसरातील नागरिकांनी शासनाच्या आदेशाचे पालन करून प्रशासनास सहकार्य करावे
- शारदा दळवी, तहसीलदार, आष्टी.