कॉन्टॅक्ट ट्रेसिंग होतेय, पण लोक कोरोना चाचणी करण्यासाठी तोंड मुरडताहेत...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:35 IST2021-04-02T04:35:13+5:302021-04-02T04:35:13+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क बीड : जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कातील लोकांचा शोध घेऊन कोरोना चाचणी करणे अपेक्षित असते. आरोग्य विभागाकडून ...

Contact tracing is done, but people are scrambling to test the corona ...! | कॉन्टॅक्ट ट्रेसिंग होतेय, पण लोक कोरोना चाचणी करण्यासाठी तोंड मुरडताहेत...!

कॉन्टॅक्ट ट्रेसिंग होतेय, पण लोक कोरोना चाचणी करण्यासाठी तोंड मुरडताहेत...!

लोकमत न्यूज नेटवर्क

बीड : जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कातील लोकांचा शोध घेऊन कोरोना चाचणी करणे अपेक्षित असते. आरोग्य विभागाकडून संबंधितांना संपर्क करून चाचणी करण्याचे आवाहन केले जात आहे; परंतु याला कोणीच प्रतिसाद देत नसल्याचे समोर आले आहे. आता आवाहन करून प्रशासनही थकले आहे. चाचणी करण्यास लोक तोंड मुरडत असल्याने संसर्ग दिवसेंंदिवस वाढतच चालला आहे.

जिल्ह्यात दररोज ३०० पेक्षा जास्त नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळत आहेत. गुरुवारीही ३९३ नवे रुग्ण आढळले. यातील १५४ रुग्ण हे बाधितांच्या संपर्कातील होते. त्यामुळे संपर्कात असलेल्यांनी तत्काळ चाचणी करणे अपेक्षित आहे. तसेच ज्यांना सर्दी, ताप, खोकला, थकवा, आदी लक्षणे आहेत, त्यांनीही कोरोनापासून बचाव करण्यासाठी चाचणी करणे गरजेचे आहे. यामुळे वेळीच निदान होऊन त्यावर उपचार करणे सोपे होणार आहे. शिवाय संसर्गही टळणार आहे.

लक्षणे असली तरी खासगी रुग्णालयांमध्ये उपचार

जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या रोज वाढत असली तरी बहुतांश लोक स्वत:हून पुढे येत चाचण्या करण्यास अनुत्साह दाखवित आहेत. थोडीही लक्षणे असल्यास खासगी रुग्णालयांचा दरवाजा ठोठावतात.

असे असले तरी काही जबाबदार डॉक्टर अशा संशयितांना तत्काळ काेरोना चाचणी करण्याचा सल्ला देत आहेत. दुखणे अंगावर काढू नका, असे सांगत त्यांना चाचणीसाठी पाठवित असल्याचे दिसते.

काही खासगी डॉक्टर मात्र ओळख आणि लक्षणे नसल्याचे कारण दाखवित आपल्याच खासगी रुग्णालयात दाखल करून घेत आहेत. याची माहितीही आरोग्य विभागाला देत नसल्याची उदाहरणे आहेत.

कॉन्टॅक्ट करून चाचणीचे आवाहन करताहेत

जिल्ह्यात आतापर्यंत पावणेपाच लाख लोकांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करण्यात आले आहे. सुरुवातीला प्रत्येकाचा पाठपुरावा करणे सोपे होते; परंतु आता रुग्णसंख्या वाढत असल्याने एकदा संपर्क करून त्यांना चाचणी करण्याचे आवाहन केले जाते. परंतु तरीही काही लोक जात नाहीत. प्रत्येकाला धरून आणणेही सोपे नाही. सर्वांनी स्वत:हून चाचणी करावी.

- डॉ. आर. बी. पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी, बीड

हा घ्या पुरावा

बीड शहरातील पांगरी रोड भागातील एक तरुण कोरोनाबाधित आढळला. त्याची कॉन्टॅक्ट ट्रेसिंग केली. यात कुटुंबीयांनी स्वत:हून चाचणी केली; परंतु त्याचे मित्र, इतर क्लोज कॉन्टॅक्ट असलेल्या व्यक्तींनी चाचणी केली नाही. त्यांना लक्षणे नसले तरी नियमानुसार त्यांची चाचणी करणे अपेक्षित होते; परंतु एकानेही चाचणी केली नाही.

काही दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयातच एक बैठक झाली होती. याच बैठकीला उपस्थित असणारे अधिकारी कोरोना पॉझिटिव्ह आले होते. त्यामुळे येथील सर्वांनी चाचणी करणे अपेक्षित होते; परंतु यात केवळ मुख्य कार्यकारी अधिकारी यांनीच चाचणी केली. इतर एकाही अधिकाऱ्याने चाचणी केली नाही. प्रशासनानेच सर्व नियम पायदळी तुडविले होते.

Web Title: Contact tracing is done, but people are scrambling to test the corona ...!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.