लस न मिळाल्याने गोंधळ, घोषणाबाजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 04:24 IST2021-06-25T04:24:05+5:302021-06-25T04:24:05+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पाटोदा ममदापूर : अंबाजोगाई तालुक्यातील धानोरा बुद्रुक येथील ग्रामीण रुग्णालयात २१ जूनपासून १८ वर्षांपुढील सर्वांना लस ...

लस न मिळाल्याने गोंधळ, घोषणाबाजी
लोकमत न्यूज नेटवर्क
पाटोदा ममदापूर : अंबाजोगाई तालुक्यातील धानोरा बुद्रुक येथील ग्रामीण रुग्णालयात २१ जूनपासून १८ वर्षांपुढील सर्वांना लस देण्यास सुरुवात केली आहे. परंतु येथे नियोजन नसल्याने लस घेण्यासाठी आलेल्या नागरिकांना तासन् तास ताटकळत उभे राहावे लागत आहे. अनेकांना लस न घेताच माघारी परतावे लागले. यावेळी नागरिकांनी घोषणाबाजी करून निषेध केला. यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
येथील अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कोणाचाही वचक राहिलेला दिसत नाही. २३ जून रोजी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास दवाखान्याच्या आवारात नागरिकांच्या रांगा लावल्या होत्या. परंतु अचानक एकाने बाहेर येऊन सांगितले की, लसीचे आजचे टार्गेट पूर्ण झाले आहे. ज्यांनी रजिस्टरला नोंद केली आहे, त्यांनी आपले नाव रजिस्टरवरून कमी करावे. उद्या सकाळी लवकर... या असे म्हणून उपस्थित २५ ते ३० लसधारकांना तेथून परत पाठविले.
सुरक्षा रक्षकांनी बाहेर काढले
लस न मिळाल्याने उपस्थित तरुणांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. पण लस संपली आहे, तुम्ही उद्या सकाळी लवकर या... असे म्हणत तेथील सुरक्षा गार्डने उपस्थितांना गेटच्या बाहेर काढले. काही लसधारक दुपारी तीन वाजता लस घेण्यासाठी गेले. त्यावेळी ग्रामीण रुग्णालयात फक्त दोन सिस्टर, एक महिला सेवक व सुरक्षा रक्षक एवढेच कर्मचारी उपस्थित होते. बुधवारी लस घेण्यासाठी पाटोदा ममदापूर, धानोरा बुद्रुक, देवळा, मुडेगाव, राडी, राडी तांडा, आकोला या गावातून महिला, पुरुषांना रिकाम्या हातांनी परत जावे लागले.
...असा प्रकार घडलाच नाही
याबाबत ग्रामीण रुग्णालयाचे प्रभारी डाॅ. मारतोळे यांच्याशी संपर्क साधला असता, असा काही प्रकार बुधवारी येथे घडलाच नाही, असे सांगितले. असे झाले असेल तर मी स्वतः लक्ष घालून योग्य कार्यवाही करतो, असे त्यांनी सांगितले. तसेच तालुका आरोग्य अधिकारी डाॅ. लोमटे यांच्याशी संपर्क साधला असता, झालेला प्रकार हा निंदनीय आहे. असे काही झाले असेल तर माहिती घेऊन कारवाई करतो, असे त्यांनी सांगितले.