इतर कारखान्यांच्या तुलनेत छत्रपतीने दिला तोडीसतोड भाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:58 IST2021-03-13T04:58:49+5:302021-03-13T04:58:49+5:30
पुरुषोत्तम करवा माजलगाव : नवीन कारखाना असताना व कोणत्याही उपपदार्थांची निर्मिती होत नसताना सावरगाव येथील छत्रपती सहकारी साखर कारखान्याने ...

इतर कारखान्यांच्या तुलनेत छत्रपतीने दिला तोडीसतोड भाव
पुरुषोत्तम करवा
माजलगाव : नवीन कारखाना असताना व कोणत्याही उपपदार्थांची निर्मिती होत नसताना सावरगाव येथील छत्रपती सहकारी साखर कारखान्याने इतर कारखान्यांच्या तोडीस तोड भाव दिला आहे. या कारखान्याने चार महिन्यांत पावणेतीन लाख मे. टन उसाचे गाळप केल्याची माहिती अध्यक्ष मोहन जगताप यांनी दिली.
माजलगाव तालुक्यात उसाचे उत्पादन पाहता माजी आ. बाजीराव जगताप यांनी सावरगाव येथे युती सरकारच्या काळात बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून कारखान्यास मंजुरी मिळवली होती. त्यानंतर सत्तांतर झाले. अनेकांच्या राजकीय विरोधामुळे या कारखान्याच्या उभारणीस अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता. १४-१५ वर्षांच्या राजकीय विरोधानंतर हा कारखाना उभा राहिला. कारखान्याने प्रत्यक्षात २०१४-१५ मध्ये गाळपास सुरुवात केली. सुरुवातीपासूनच या कारखान्यापुढे उसाच्या कमतरतेचा प्रश्न होता. तालुक्यातील खासगी तत्त्वावर चालणाऱ्या जयमहेश शुगर व लोकनेते सुंदरराव सोळंके या ३० वर्षांच्या कारखान्यांसमोर छत्रपती सहकारी साखर कारखान्याचा निभाव लागेल की नाही, असे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना वाटत होते. हा कारखाना नवीन असल्याने व कोणतेही उपपदार्थ तयार होत नसल्याने हा कारखाना या दोन्ही कारखान्यांच्या मुकाबल्यात भाव देईल की नाही, असा प्रश्न होता. कारखान्याचे उपाध्यक्ष मोहन जगताप यांनी इतर कामांत काटकसर करत दोन्ही कारखान्यांच्या मुकाबल्यात उसाला एक रुपयाही कमी भाव दिला नाही. विशेष म्हणजे तालुक्यातील दोन्ही कारखान्यांकडे उपपदार्थांची निर्मिती केली जाते. यामुळे या कारखान्याबदल विश्वास निर्माण झाल्याने शेतकरी बिनधास्त या कारखान्यास ऊस देऊ लागले.
यावर्षी या कारखान्याने १३०० मे. टनाची गाळप क्षमता असताना, दोन हजारांपेक्षा जास्त मे. टनाचे दररोज गाळप केले. कारखान्याने १३४ दिवसांत २ लाख ७६ हजार ५६० मे. टनाचे मंगळवारपर्यंत गाळप करत ९.५९ उतारा मिळवत २ लाख ६२ हजार ५०० क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. आमचा कारखाना यावर्षी ४ लाख मे. टन उसाचे गाळप करील, असा अंदाज असून, इतर कारखान्यांच्या तुलनेत आम्ही आतापर्यंत चांगला भाव देत आलो आहोत. - मोहन जगताप, उपाध्यक्ष छत्रपती सहकारी साखर कारखाना
माजलगाव तालुक्यातील लोकनेते सुंदरराव सोळंके सहकारी साखर कारखान्याने यावर्षी आतापर्यंत १ हजार ८८५ रुपये, जयमहेश शुगरने २ हजार रुपये, तर छत्रपती सहकारी साखर कारखान्याने १ हजार ९०० रुपये भाव दिला आहे.
===Photopath===
120321\12bed_3_12032021_14.jpg~120321\12bed_4_12032021_14.jpg
===Caption===
छत्रपती कारखाना, मोहन जगताप~छत्रपती कारखाना, मोहन जगताप