दिलासादायक; अखेर जिल्हा रुग्णालयात दिव्यांगांचा बोर्ड सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:23 IST2021-06-24T04:23:34+5:302021-06-24T04:23:34+5:30
बीड : कोरोनामुळे मागील सहा महिन्यांपासून दिव्यांगांना प्रमाणपत्र दिले जात नव्हते. परंतु, आता हा बोर्ड सुरू करण्यात आला आहे. ...

दिलासादायक; अखेर जिल्हा रुग्णालयात दिव्यांगांचा बोर्ड सुरू
बीड : कोरोनामुळे मागील सहा महिन्यांपासून दिव्यांगांना प्रमाणपत्र दिले जात नव्हते. परंतु, आता हा बोर्ड सुरू करण्यात आला आहे. बुधवारी दिवसभर तपासणी करून समितीने त्यांना प्रमाणपत्र दिले. खुद्द जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ. सुरेश साबळे हे ठाण मांडून होते. त्यामुळे सर्वांना वेळेत प्रमाणपत्र मिळाल्याचे सांगण्यात आले.
मागील वर्षभरापासून कोरोनाने थैमान घातले आहे. त्यामुळे शस्त्रक्रिया, दिव्यांगांचा बोर्ड हे थांबले होते. परंतु, आता कोरोना रुग्णसंख्या कमी झाल्याने हे सर्व पुन्हा सुरू करण्यात आले आहे. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश साबळे यांनी पदभार स्वीकारताच स्थलांतरित जिल्हा रुग्णालयात पहिली शस्त्रक्रिया करण्याचे आदेश दिले. त्यापाठोपाठ म्युकरमायकोसिस या आजाराची गंभीर शस्त्रक्रिया पहिल्यांदाच जिल्हा रुग्णालयात यशस्वीरीत्या पार पडली. हे झाले तरी दिव्यांग बोर्ड बंद असल्याने तक्रारी वाढल्या होत्या. हाच धागा पकडून डॉ. साबळे यांनी मंगळवारी आदेश देत बुधवारी लगेच बोर्ड भरविण्याचे आदेश दिले. प्रमाणपत्राचे नूतनीकरण, नवे प्रमाणपत्र, तपासणी, आदी कामे समितीच्या समोर करण्यात आली. डॉ. साबळे देखील दिवसभर समितीसह रुग्णालयात ठाण मांडून हाेते. सहा महिन्यांनंतर पहिल्यांदाच बोर्ड भरविल्याने दिव्यांग व्यक्तींमधून समाधान व्यक्त होत आहे.
....
दिव्यांग बोर्ड बंद असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यामुळे बुधवारपासून हा बोर्ड सुरू करण्यात आला आहे. लोखंडी सवरगाव येथेही एक दिवस बोर्ड भरविला जाणार आहे. येथे सर्व समिती उपस्थित असेल. दिव्यांगांनी लाभ घ्यावा.
- डॉ. सुरेश साबळे, जिल्हा शल्य चिकित्सक, बीड.
===Photopath===
230621\23_2_bed_8_23062021_14.jpeg
===Caption===
दिव्यांगांची तपासणी करताना जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुरेश साबळे, डॉ.सुखदेव राठोड व समिती दिसत आहे.