बिबट्याला पकडण्यासाठी आष्टी तालुक्यात वनविभाचे कोम्बिंग ऑपरेशन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2020 15:28 IST2020-11-30T15:28:00+5:302020-11-30T15:28:43+5:30
वन विभागाने रविवारी रात्रीपासून संपूर्ण तालुका काढला पिंजून

बिबट्याला पकडण्यासाठी आष्टी तालुक्यात वनविभाचे कोम्बिंग ऑपरेशन
- अविनाश कदम
आष्टी : तालुक्यात बिबट्याने धुमाकूळ घातला असून जोगेश्वरी पारगांव येथे दिवसात एकाच दिवशी बिबट्याच्या हल्ल्यात १ महिला जखमी झाली तर एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी घडली आहे. या परिसरात बिबट्याला पकडण्यासाठी कोम्बिंग आॅपरेशन सुरु आहे. या दरम्यान काही ठिकाणी बिबट्याचे ठसे आढळून आले आहेत. दरम्यान, बिबट्याला जेरबंद करण्यासाठी काही वेळात जुन्नरचे पथक तालुक्यात दाखल होणार असल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी शाम सिरसाठ यांनी दिली आहे.
आष्टी तालुक्यात बिबट्याचे हल्ले वाढत असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतक-यांनी शेतात एकटे जाऊ नये समुहाने शेतात जावे. हातात काठी असावी रात्री घराच्या बाहेर पडू नये, असे आवाहन वनविभाग व पोलिस प्रशासनाने केले आहे. जोगेश्वरी पारगांव येथे घटनास्थळी रात्रभर बिबट्याला शोधण्यासाठी कोम्बिंग आॅपरेशन राबविण्यात आले. यावेळी काही ठिकाणी बिबट्याच्या ठसे आढळून आले आहेत. यावरून पथक बिबट्याचा माग काढत आहे.
तालुक्यात जुन्नरचे पथक येणार
दरम्यान, सोमवारी सकाळपासून वन विभागाची पथके आष्टी तालुक्यात सर्वत्र सर्च मोहीम राबवत आहेत. सुर्डी, किन्ही, पांगुळगव्हाण, मंगरूळ आणि पारगाव जोगेश्वरीमध्ये सध्या वन कर्मचारी बिबट्याला जेरबंद करण्यासाठी कामाला लागले आहेत. या परिसरामध्ये ठिकठिकाणी पिंजरे लावण्यात आले आहेत. आज रात्रीपर्यंत जुन्नरचे विशेष श्वान पथक आष्टीत दाखल होणार असल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी शाम सिरसाठ यांनी दिली आहे.