प्रा आ केंद्र वडवणी येथे कोविड लसीकरणाची रंगीत तालीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 04:27 IST2021-01-09T04:27:35+5:302021-01-09T04:27:35+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क वडवणी : केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार शुक्रवारी सकाळी प्राथमिक आरोग्य केंद्र, वडवणी येथे लसीकरणाचे प्रात्यक्षिक ...

प्रा आ केंद्र वडवणी येथे कोविड लसीकरणाची रंगीत तालीम
लोकमत न्यूज नेटवर्क
वडवणी : केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार शुक्रवारी सकाळी प्राथमिक आरोग्य केंद्र, वडवणी येथे लसीकरणाचे प्रात्यक्षिक ‘ड्राय रन’ घेण्यात आली. जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. आर. बी. पवार व जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डाॅ. संजय कदम यांनी आरोग्य केंद्राला भेट देऊन पाहणी केली.
लसीकरण ड्राय रन मोहिमेसाठी आवश्यक पूर्वतयारी करण्यात आली होती. प्राथमिक आरोग्य केंद्र, वडवणी येथे चाचणीसाठी लाभार्थ्यांची निवड करून ‘कोविन’ ॲपमध्ये लसीकरण सत्र तयार करणे आणि त्याचे मॅपिंग करणे, चाचणी लाभार्थ्यांची माहिती कोविन पोर्टलवर अपलोड करणे, लाभार्थी व आरोग्य सेविकेचे सत्र स्थळ निश्चित करणे, लसवाटप व शीतसाखळी केंद्राला कळविणे, आरोग्य सेविकेला सत्राचा दिवस व वेळ कळविणे, लसीकरण अधिकारी १ ते ४ आणि पर्यवेक्षक यांच्या जबाबदाऱ्या निश्चित करून त्यांना त्याची माहिती देणे आदी पूर्वतयारी करण्यात आली होती.
यासंदर्भात व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून प्रशिक्षणही देण्यात आले आहे. या ‘ड्राय रन’मध्ये सत्र स्थळावर चाचणी लाभार्थ्यांचे निरीक्षण करून एका केंद्रावर २५ लाभार्थ्यांना लसीकरण केले जाईल. कोविन ॲपवरील नोंदणीनुसार कक्षात सोडले जाईल. त्यानंतर माहितीची पडताळणी केल्यानंतर लसीकरणाच्या माहितीची नोंद ॲपमध्ये करण्यात येईल. कोरोना लसीकरण सत्र आयोजित करताना कोरोनासंदर्भातील नियमांची अंमलबजावणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. प्रत्यक्ष लसीकरण सुरू करण्यापूर्वी, लसीकरणाबाबतची आव्हाने व त्यानुसार मार्गदर्शक सूचना तयार करणे, लसीकरण मोहिमेतील सर्व स्तरावरील अधिकारी तसेच कर्मचारी यांचा आत्मविश्वास वाढविणे यासाठी ड्राय रन घेतले जाते, असे जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. आर. बी. पवार यांनी सांगितले.
ड्राय रन कोविड लसीकरणाची रंगीत तालीम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी तालुका आरोग्य अधिकारी डाॅ. एम. बी. घुबडे, वैद्यकीय अधिकारी डाॅ. बाळासाहेब तांदळे, डाॅ. अरुण मोराळे, आरोग्य विस्तार अधिकारी गणेश जाधव, आरोग्य सहाय्यक मधुकर साळवे, एम. जी. नांगरे, आरोग्यसेविका ए. बी. पाठक, कल्याणी दरवई, मनोज वाघमारे, भास्कर वाघे यांनी परिश्रम घेतले.