आष्टी: राज्यात सध्या २७ लक्ष ५३ हजार रुग्ण कोरोना बाधित असून मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. बीड जिल्ह्यातही बाधितांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने केंद्र शासन व राज्य शासनाच्या आदेशानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी
रुग्ण संख्या वाढीचा दर पाहून दहा दिवसांसाठी केलेले लाॅकडाऊन योग्यच आहे. विरोधासाठी विरोध करणे चुकीचे असल्याचे माजी आ.भिमसेन धोंडे यांनी शुक्रवारी आष्टी येथे पत्रकार परिषदेत सांगितले.
बीड जिल्ह्यात आजपर्यंत २३ हजार ९८ कोरोना रूग्ण आढळून आले यामध्ये ६१० जणांचा मृत्यू झाले असून २ हजार ४२३ ॲक्टिव्ह रूग्ण आहेत. आष्टीत २ हजार २४२ बाधित तर ४४ मृत्यू, शिरूर ८०० बाधित, पाटोदा ७३५ बाधित २६ मृत्यू अशी रूग्णाची संख्या वाढत असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी १० दिवसांसाठी लाॅकडाॅऊन जाहीर केला असून या निर्णयाला काही कार्यकर्ते दोन दिवसांपासून विरोध करत असून ते जिल्हाधिकाऱ्यांना दोष देत आहेत. आरोग्य विभागाच्या तज्ज्ञांच्या मते जर याचप्रमाणे आकडे वाढले तर परिस्थिती गंभीर होऊ शकते. प्रशासनाने नागरिकांना लस घेण्यासाठी प्रेरित करावे व सर्व नागरिकांनी मास्क व सॅनिटायझर वापरावे, सोशल डिस्टन्सिंग ठेवावे असे आवाहन धोंडे यांनी केले.
व्यापाऱ्यांनी कोरोनाला गांभीर्याने घ्यावे
आष्टी तालुक्यातील व्यापारी बांधवांनी जिल्हाधिकाऱ्यांनी लागू केलेला लाॅकडाऊन न पाळण्याचा पवित्रा घेतला होता. गेल्या वर्षभरात छोट्या- मोठ्या व्यावसायिकांच्या धंद्यावर परिणाम झाला हे बरोबर आहे.परंतु या महामारीमुळे शहरातील काही व्यापाऱ्यांना जीव गमवावा लागला आहे. धंदा आज ना उद्या होणार असून गेलेला जीव परत येणार नाही. घरातील कर्ता पुरुष गेल्यावर कुटुंब उघड्यावर येते, म्हणून कोरोनाला गांभीर्याने घ्यावे असे आवाहन माजी आ. भीमसेन धोंडे यांनी व्यापारी बांधवांना केले आहे.