थंडी गायब, गहू - हरभरा धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:24 IST2021-02-05T08:24:41+5:302021-02-05T08:24:41+5:30
माजलगाव : यंदाच्या वर्षी पाहिजे तेवढ्या प्रमाणात थंडी न झाल्याने रब्बी पिके पूर्णतः संकटात सापडली असून, हरभरा आणि ...

थंडी गायब, गहू - हरभरा धोक्यात
माजलगाव : यंदाच्या वर्षी पाहिजे तेवढ्या प्रमाणात थंडी न झाल्याने रब्बी पिके पूर्णतः संकटात सापडली असून, हरभरा आणि गहू पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. यावर्षी खरीप हंगामदेखील हातातून गेल्याने हताश झालेल्या शेतकऱ्यांनी रब्बी पिकाच्या भरोशावर पिकाची लागवड केली. परंतु रब्बीमध्ये निसर्गाने साथ न दिल्याने रब्बीची पिकेदेखील धोक्यात आली आहेत. थंडी नसल्याने हरभरा आणि गहू पिके ही केवळ उगवली असून, हरभऱ्याचे घाटे फोस तर गव्हाच्या ओंब्यादेखील रिकाम्या राहात असून, शेतकरी हवालदिल झाला आहे. यावर्षी खरीप पिकाचे पूर्ण नुकसान सहन करत असताना पुन्हा रब्बीने धोका दिला आहे. खरिपाच्या कापसाची तर केवळ एकच वेचणी होऊन पळाट्या शिल्लक राहिल्या होत्या. त्यामुळे जे हाती आले त्यावरच समाधान मानत असताना रब्बीने अस्मानी संकटाचा मारा करत शेतकऱ्यांना संकटात टाकले आहे. यंदा गहू आणि हरभऱ्याची लागवड मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी केली आहे. परंतु लागवडीच्या केवळ ५ ते १० टक्केच उत्पादन शेतकऱ्यांच्या पदरी पडण्याची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे.
अद्याप अनुदान मिळाले नाही
शेतकऱ्यांना सुलतानीबरोबरच अस्मानी संकट असताना बहुतांश शेतकऱ्यांना शासनाने जाहीर केलेल्या अनुदानाची रक्कम अद्याप मिळाली नाही. नवीन कर्जदेखील नाही. जुने कर्ज भरल्यानंतर नवीन कर्ज मिळण्यासाठी शेतकरी बँकेच्या दारी उभा असताना अद्यापदेखील नवीन कर्ज मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत आहेत. लवकरात लवकर मदत मिळावी, अशी मागणी होत आहे. रब्बी आणि खरीप हातचे गेल्याने खासगी सावकारांचे चांगभले होताना दिसून येत आहे.