बीड : मस्साजोग सरपंच हत्या प्रकरणातील फरार तीन आरोपींचे मृतदेह सापडल्याचा व्हॉइस मेसेज अज्ञात व्यक्तीने सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांना पाठविला होता. त्याची माध्यमांनाही माहिती दिल्याने खळबळ उडाली होती. त्यानंतर बीड पोलिसांनी याचा तपास केला असता, संबंधिताने दारूच्या नशेत हे कृत्य केल्याचे समोर आले आहे. तर दमानिया यांनाही यासंदर्भात बीड पोलिसांनी नोटीस बजावली आहे.
कारवाई झाली आहे. ती व्यक्ती कोण? त्याचे नाव काय? तो कुठला आहे? याची माहिती तुम्हाला देता येत नाही.- उस्मान शेख, पोलिस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, बीड
मला जी माहिती होती ती एसपींना दिली. मला जे पत्र आले आहे ते क्राईम ब्रँचकडून आले आहे. क्राईम ब्रँच आणि सीआयडी काय, ज्यांना माहिती हवी, त्यांना द्यायला तयार आहे. - अंजली दमानिया, सामाजिक कार्यकर्त्या
सीआयडीचे तपासावर मौनमस्साजोग सरपंच हत्या, खंडणी आणि मारहाण प्रकरणाचे तीनही तपास सध्या सीआयडी करीत आहे. परंतु २० दिवस उलटले तरी यातील वाल्मीक कराड, सुदर्शन घुलेसह पाच आरोपी मोकाटच आहेत. याबाबत सीआयडीच्या अधिकाऱ्यांना विचारणा केल्यावर ‘नाे कॉमेंट्स’ एवढीच प्रतिक्रिया मिळते. अधिकाऱ्यांच्या मौनामुळे तपासावरच आता प्रश्न उपस्थित होत आहे.
६ डिसेंबर रोजी केज तालुक्यातील मस्साजोग येथील पवनचक्कीचे काम करणाऱ्या सुरक्षारक्षकाला मारहाण झाली. त्यानंतर ९ डिसेंबरला अपहरण करून सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली. ११ डिसेंबरला कंपनीच्या अधिकाऱ्याला २ कोटी रुपयांची खंडणी मागितली म्हणून वाल्मीक कराडसह तिघांवर गुन्हा दाखल झाला.
मुलगी, भाऊ काय म्हणतात?आरोपींना अटक करून लवकर न्याय द्या. न्याय मिळत नसेल तर मोर्चे काढावेच लागतील, असे सरपंच संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी म्हणाली. तर भाऊ धनंजय म्हणाले, संपत्ती जप्त करून काय होणार? आरोपी अटक व्हायला हवेत.