फुकट्या जाहिरातदारांमुळे शहर विद्रुप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:48 IST2021-01-08T05:48:04+5:302021-01-08T05:48:04+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क बीड : शहरात सध्या सर्वत्रच अनाधिकृत फलक लावून जाहिराती केल्या जात आहेत. यातून पालिकेला एक रुपयाचाही ...

फुकट्या जाहिरातदारांमुळे शहर विद्रुप
लाेकमत न्यूज नेटवर्क
बीड : शहरात सध्या सर्वत्रच अनाधिकृत फलक लावून जाहिराती केल्या जात आहेत. यातून पालिकेला एक रुपयाचाही महसूल मिळत नाही, मात्र शहर पूर्णपणे विद्रुप दिसत आहे. पालिकेकडूनही हे फलक हटविण्यासंदर्भात कडक कारवाई केली जात नसल्याने दिवसेंदिवस शहरात अनधिकृत फलकांची संख्या वाढत आहे.
बीड शहरात साधारण २० ठिकाणी अधिकृत फलक लावण्यासाठी परवानगी देण्यात आलेली आहे. यासाठी एका खासगी संस्थेला ठेका दिला जातो. परंतु, यावर्षी कोरोनामुळे हा ठेका घेण्यासाठी कोणीही पुढे आलेले नाही. त्यातही जर कंत्राट घेतले, तरी अनधिकृत फलकांवर पालिका कारवाई करत नसल्याने परवानगी घेऊन कोणीही फलक लावत नाहीत. याचा फटका पालिकेच्या करालाही बसत आहे. त्यामुळे पालिका आर्थिक अडचणीत सापडत असून, हे टाळण्यासाठी पालिकेने विशेष मोहीम राबवत सर्व अनधिकृत फलक हटविण्याची गरज आहे. यामुळे शहराचे विद्रुपीकरण थांबेल. दरम्यान, अनेक ठिकाणी दुभाजकांमध्ये लावलेल्या फलकांमुळे वाहनांचे अपघातही होत आहेत.
कारवाई करताना पालिकेवर दबाव
n एखाद्या व्यक्तीला ठेका दिल्यानंतर ठरवून दिलेल्या जागेतच फलक लागणे अपेक्षित असते. परंतु, काही लोकप्रतिनिधी, संस्था, नेते हे कसलीही परवानगी न घेता काेठेही फलक लावतात.
n फुकटात प्रसिद्धी होत असल्याने भाडे देऊन फलक लावण्यासाठी कोणीही पुढे येत नाही. याबाबत संबंधित ठेकेदाराने पालिकेला पत्र दिले होते.
n त्यानुसार कारवाई करायला गेलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांवर अनधिकृत फलक लावणारे लोकच दबाव आणतात.
कमाईसाठी वर्षापासून टेंडरच नाही
बीड पालिकेकडून एका खाजगी संस्थेला होर्डींग लावण्यासाठी कंत्राट दिले जाते. २०१९-१९ मध्ये १० लाख २५ हजार रूपयांना एका वर्षासाठी कंत्राट दिले होते. परंतु त्यानंतर दोन वेळा हे कंत्राट देण्यासाठी टेंडर ओपण करण्यात आले. परंतु कोणीच भरले नाही. त्यामुळे सध्या शहरात लागलेले बॅनरमधून पालिकेला कसलीच कमाई होत नसल्याचे दिसत आहे.
पालिकेने शहरात लावलेल्या अनाधिकृत बॅनरवर कारवाई तर करावीच परंतु जेथून बॅनर बनतात, त्यांनाही आगोदर परवानगीचे पत्र पाहिल्यावरच बॅनर बनविण्यास सांगावे. यामुळे शहर विद्रूप होणार नाही.
- राहुल वाईकर, माजी अध्यक्ष
संभाजी ब्रिगेड संघटना, बीड
२०१८-१९ साली एका व्यक्तीला सव्वा दहा लाख रूपयांना एका वर्षासाठी कंत्राट दिले होते. त्यानंतर कोरोनामुळे दोन वेळा टेंडर काढूनही कोणीच आले नाही. आता तिसऱ्यांना काढले जाणार आहे. सध्या शहरात लागलेल्या जाहिरातींबाबत माहिती घेतो.
- इद्रिस इनामदार, कर विभाग, बीड