शहरात ७ वाहनांद्वारे घातली जाते गस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:28 IST2021-02-05T08:28:33+5:302021-02-05T08:28:33+5:30
बीड : शहरात चोरी तसेच घरफोडी व अनुचित प्रकार रोखण्यासाठी पोलिसांच्या वतीने रात्रीच्या वेळी गस्त घातली जाते. यामध्ये तीन ...

शहरात ७ वाहनांद्वारे घातली जाते गस्त
बीड : शहरात चोरी तसेच घरफोडी व अनुचित प्रकार रोखण्यासाठी पोलिसांच्या वतीने रात्रीच्या वेळी गस्त घातली जाते. यामध्ये तीन ठाण्याच्या तीन चारचाकी व चार दुचाकी अशा सात वाहनांच्या माध्यमातून साधारण २० ते २५ पोलीस अधिकारी कर्मचारी गस्त घालतात, क्यूआर कोड व जीपीएसद्वारे नियंत्रण ठेवले जाते मात्र, गस्त वाहने असताना देखील रात्रीच्या वेळी अवैधरित्या वाळू व गुटखा वाहतूक होत असल्याचे चित्र आहे.
बीड शहरात रात्रीच्या वेळी चोरी-घरफोडी व इतर प्रकार रोखण्यासाठी पेठ बीड पोलीस ठाणे, शिवाजीनगर पोलीस ठाणे व बीड शहर ठाण्याच्या तीन चारचाकीच्या माध्यमातून रात्रीच्या वेळी गस्त घातली जाते. शहरातील मुख्य बाजारपेठ असलेला मोंढा तसेच सुभाष रोड, यासह मार्केट यार्ड व शहराच्या, लगतच्या परिसरातील खेड्यांमध्ये देखील पेट्रोलिंग केली जाते. या गस्तीमुळे घरफोडी रोखण्यास मदत होते. मात्र, रात्रीच्या वेळी होणारी अवैध वाळू वाहतूक तसेच गुटखा वाहतूक रोखण्यासाठी गस्त वाहनांंकडून कारवाई करणे गरजेचे आहे. मात्र, या कारवाया मागील काळात कमी झाल्याचे चित्र असून, रात्रीच्या वेळी होत असलेली वाळू व गुटखा वाहतूक गुन्ह्यात मात्र, वाढ झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे नेमकं गस्त वाहनांवर नियंत्रण हे प्रशासनाचे आहे की अवैध धंदेवाल्यांचे याविषयी प्रश्न उपस्थित केले जाते आहे. कारण शहरात मोठ्या प्रमाणात वाळू व गुटखा याची वाहतूक ही रात्रीच्या वेळी केली जाते, यामध्ये त्या वाहनांना रस्ता दाखवण्याचे काम गस्त वाहनांनी केल्याचे देखील काही प्रकरणात समोर आले होते.
चोरी-घरफोडीमध्ये वाढ
रात्रीच्या वेळी तसेच दिवसां देखील गस्त घलणारी वाहने जिल्ह्यात कार्यरत आहेत. मात्र, तरी देखील जिल्ह्यात दुचाकी चोरीचे प्रमाण हे वाढलेले आहे. तर, मागील वर्षा अखेरपर्यंत २१७ घरफोड्या झाल्या आहेत. तर, दरोडे १४ झाले होते. यापैकी अनेक प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखा व संबंधित पोलीस ठाण्याने कारवाई करत आरोपी अटक केले आहेत. काहींचा तपास सुरु असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.
रात्रीतून वाळू व गुटका वाहतूक जोमात
रात्रीच्या वेळी गस्त वाहने कार्यरत असताना देखील बीड शहरातून वाळूची चोरट्या पद्धतीने वाहतूक केली जाते. हे सर्वश्रूत असताना देखील यावर कमी प्रमाणात कारवाया केल्या जातात. तसेच, काही वेळेला गाडी ताब्यात आल्यानंतर देखील सोडून दिल्याच्या घटना घडलेल्या आहेत. गुटखा प्रकरणात देखील तिच परिस्थिती असून, परराज्यातून तसेच जिल्ह्यातून गुटखा रात्रीच्या वेळी वाहतूक केली जाते. मात्र, याकडे पूर्णपणे ‘अर्थपूर्ण’ दुर्लक्ष केले जात असल्याचे समोर आलेले आहे.
७ शहरातील गस्तीवरील वाहने
४ दुचाकी
३ चारचाकी
२० ते २५ कर्मचारी
असे ठेवले जाते नियंत्रण
पोलीस अधीक्षक कार्यालयातील निंत्रण कक्षातून या वाहनांना सूचना दिल्या जातात. तसेच त्या-त्या ठिकाणी गस्त घालण्यासाठी वाहन गेले होते की नाही याची तपासणी करण्यासाठी जीपीएस व क्यू -आर कोड स्कॅन करण्याची प्रणालीचा वापर केला जातो.