घाटसावळी, पारगाव सिरस, कुर्ला, चऱ्हाटा, येळंबघाट होणार सर्कल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:23 IST2021-06-26T04:23:59+5:302021-06-26T04:23:59+5:30

बीड तालुक्यात पाच मंडळांची भर बीड : तालुक्यातील घाटसावळी, पारगाव सिरस, कुर्ला, चराटा व येळंबघाट या पाच नवीन महसूल ...

Circles will be Ghatsavali, Pargaon Sirus, Kurla, Charhata, Yelambaghat | घाटसावळी, पारगाव सिरस, कुर्ला, चऱ्हाटा, येळंबघाट होणार सर्कल

घाटसावळी, पारगाव सिरस, कुर्ला, चऱ्हाटा, येळंबघाट होणार सर्कल

बीड तालुक्यात पाच मंडळांची भर

बीड : तालुक्यातील घाटसावळी, पारगाव सिरस, कुर्ला, चराटा व येळंबघाट या पाच नवीन महसूल मंडळास नुकतीच राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी बीड जिल्ह्यात डोंगरी गावे जाहीर करून नवीन महसूल मंडळ निर्माण होण्यासाठी प्रयत्न केले होते. यामुळे डोंगरी गावांना विविध सुविधा प्राधान्याने मिळाल्या आहेत.

बीड जिल्ह्यामध्ये भौगोलिकदृष्ट्या बीड तालुका हा सर्वांत मोठा आहे. शेतकरी व सर्वसामान्य जनतेचे प्रश्न मंडळ अधिकारी कार्यालय व तलाठी सजाकडून सोडविले जातात. शेतकऱ्यांना व सर्वसामान्य लोकांना सोयीचे व्हावे म्हणून गेल्या अनेक वर्षांपासून नवीन महसूल मंडळ व तलाठी सजाची मागणी माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्याकडे बीड तालुक्यातील आणि खेड्यातील कार्यकर्ते करीत होते. जयदत्त क्षीरसागर यांनी तत्कालीन मंत्रिमंडळात असतानाच जिल्ह्यात नवीन तालुका निर्मितीच्या वेळी डोंगरी गावे जाहीर करून त्यांना प्राधान्याने सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, तसेच नवीन महसुली गावे निर्माण करून स्वतंत्र तलाठी सजा तयार करावा, अशी आग्रहाची मागणी केली होती. त्यानंतर आमदार असताना तत्कालीन जिल्हाधिकारी एम. डी. सिंह यांच्यामार्फत प्रारूप आराखडा तयार करून नवीन महसूल मंडळे व तलाठी सजे निर्माण करण्यात आले होते. गेल्या तीन वर्षांपासून हा आराखडा मंजुरीअभावी शासन दरबारी पडून होता. माजी मंत्री क्षीरसागर यांनी सतत पाठपुरावा केल्याने घाटसावळी, पारगाव सिरस, कुर्ला, चऱ्हाटा व येळंबघाट येथे नवीन महसूल मंडळास राज्य मंत्रिमंडळाने नुकतीच मान्यता दिली. त्यामुळे सर्व सामान्य व शेतकरी बांधवांना दिलासा मिळाला आहे.

बीड तालुक्यात १६ सर्कल होणार

बीड तालुक्यात बीड, पाली, मांजरसुंबा, नाळवंडी, नवगण राजुरी, पिंपळनेर, पेंडगाव, म्हाळस जवळा, चौसाळा, नेकनूर, लिंबागणेश ही मंडळे अस्तित्वात आहेत. आता नव्या पाच मंडळांना मंजुरी मिळाल्याने बीड तालुक्यातील एकूण सर्कलची संख्या १६ झाली आहे.

Web Title: Circles will be Ghatsavali, Pargaon Sirus, Kurla, Charhata, Yelambaghat