थ्रीडी प्रिंटिंग टेक्नॉलॉजीचा वापर करून चिमुकलीच्या कवटीला दिला पूर्ववत आकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:29 IST2021-02-08T04:29:42+5:302021-02-08T04:29:42+5:30

बीड : शहरातील काकू नाना हॉस्पिटल व मोतीरामजी वरपे कार्डियाक युनिटमध्ये अवघड आणि किचकट अशा कवटी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या ...

Chimukli's skull was reshaped using 3D printing technology | थ्रीडी प्रिंटिंग टेक्नॉलॉजीचा वापर करून चिमुकलीच्या कवटीला दिला पूर्ववत आकार

थ्रीडी प्रिंटिंग टेक्नॉलॉजीचा वापर करून चिमुकलीच्या कवटीला दिला पूर्ववत आकार

बीड : शहरातील काकू नाना हॉस्पिटल व मोतीरामजी वरपे कार्डियाक युनिटमध्ये अवघड आणि किचकट अशा कवटी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली. काही दिवसांपूर्वी रस्त्यावर फिरुन भांडे विक्री करणाऱ्या दहा वर्षीय मुलीचा अपघात झाला होता. तिला जखमी अवस्थेत काकू नाना मेमोरियल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तिच्या डोक्याला मोठ्या प्रमाणात मार लागल्याने कवटीचा पार चुराच झाला होता.

या शस्त्रक्रियेत चुरा झालेली कवटी काढून टाकण्यात आली. त्यामुळे कवटीवर दोष कायम राहिला आणि डोक्याचा आकार बदलला व मेंदू असुरक्षित झाला. याकरिता डोक्याचं थ्रीडी सिटी स्कॅन डॉ. मधुरा बडे यांनी केले आणि कृत्रिम कवटीची रचना तयार करून दिली. तर पुण्याचे सुप्रसिद्ध डॉ.अक्षय राऊत यांनी थ्रीडी प्रिंटिंग टेक्नाॅलॉजीचा वापर करून ऍक्रेलिक मटेरियलमध्ये कृत्रिम कवटी तयार करून दिली. या मुलीवर कवटी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया काकू नाना हॉस्पिटलमधील डॉ. समीर शेख यांनी केली.

ही शस्त्रक्रियेला सहसा बोन सिमेंटद्वारे करता येते. पण फक्त बोन सिमेंट वापरल्यावर कवटीचा आकार बदलतो आणि कॉस्मेटिक दोष दिसून येतो पण थ्रीडी प्रिंटिंग टेक्नॉलॉजीचा वापर करून ऍक्रेलिक मटेरियलमध्ये नवीन कवटी तयार करण्यात आली व ही कवटी वापरुन मुलीवर शस्त्रक्रिया करण्यात आली त्यामुळे त्या मुलीच्या कवटीला जशास तसा पूर्ववत आकार देण्यात आला.

ही शस्त्रक्रिया पार पाडण्यासाठी भूल तज्ज्ञ डॉ.श्रीकांत मोराळे, न्यूरो सहाय्यक गणेश गायकवाड, न्यूरो सहाय्यक प्रणव सपकाळ, ऑपरेशन थिएटर सहाय्यक महादेव ढोले यांनी परिश्रम घेतले. अत्यंत किचकट शस्त्रक्रिया करून ही कवटी या मुलीच्या डोक्यात बसवण्यात आली. आता त्या चिमुकलीचं आयुष्य पूर्ववत झालं आहे. कवटी प्रत्यारोपणाच्या यशस्वी शस्त्रक्रियेबद्दल न्यूरो सर्जन डॉ. समीर शेख यांचे आणि संपूर्ण टीमचे काकू नाना मेमोरियल व मोतीरामजी वरपे कार्डियाक युनिट रुग्णालयाचे संस्था अध्यक्ष आ. संदीप क्षीरसागर, संचालक अजित वरपे आणि डॉ. बालाजी जाधव, प्रशासकीय अधिकारी सय्यद बशीर यांनी स्वागत केले आहे. तर बीडकरांना आता शस्त्रक्रियेसाठी बाहेरगावी फिरावे लागणार नाही हे निश्चित झाले आहे.

Web Title: Chimukli's skull was reshaped using 3D printing technology

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.