करणी केल्याच्या संशयावरून चिमुकल्याचा बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 05:02 IST2021-02-06T05:02:56+5:302021-02-06T05:02:56+5:30
०४बीईडीपी-२४ शुभम उर्फ राज मोतीराम सपकाळ बीड तालुक्यातील रत्नागिरी येथील घटना : आरोपीस घेतले ताब्यात बीड : तालुक्यातील रत्नागिरी ...

करणी केल्याच्या संशयावरून चिमुकल्याचा बळी
०४बीईडीपी-२४ शुभम उर्फ राज मोतीराम सपकाळ
बीड तालुक्यातील रत्नागिरी येथील घटना : आरोपीस घेतले ताब्यात
बीड : तालुक्यातील रत्नागिरी येथील शाळेत खेळण्यासाठी गेलेल्या एका ६ वर्षीय चिमुकल्याचा मृतदेह बुधवारी शाळेच्या आवारात आढळला होता. दरम्यान, मृत्यूचे कारण समजू शकले नव्हते. मात्र, नातेवाइकांनी खुनाचा आरोप केल्यामुळे मृतदेह शवविच्छेदनासाठी अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला होता. त्यानंतर गळा दाबून खून झाल्याचे समोर आले. ‘म्हशीवर करणी केल्याने ती मेली व त्याचा बदला घेण्यासाठी मुलाचा खून केला,’ अशी कबुली गावातीलच आरोपी दाम्पत्याने दिली आहे.
शुभम ऊर्फ राज मोतीराम सपकाळ (६) असे खून झालेल्या बालकाचे नाव आहे. बुधवारी तो सकाळी ९.३० वाजण्याच्या दरम्यान गावातील शाळेच्या आवारात गेला होता. त्यावेळी सकाळी १०.३० ते ११ वाजण्याच्या सुमारास त्याचा मृतदेह शाळेच्या आवारात आढळून आला. त्यानंतर त्याला नेकनूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले. दरम्यान, शुभमच्या गळ्यावरील व्रण पाहून नातेवाइकांनी व ग्रामस्थांनी हा खून असल्याचा आरोप केला. त्यानंतर मृतदेह अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला होता. रात्री, उशिरा अहवाल आल्यानंतर हा खून असल्याचे निष्पन्न झाले.
दरम्यान, नेकनूर पोलीस ठाण्याचे प्रमुख सपोनि. लक्ष्मण केंद्रे, पोउपनि किशोर काळे, विलास जाधव, ढाकणे, हेकॉ. कदम खाडे, राख यांनी तपासाची चक्रे फिरवली व संशयावरून शाळेच्या मागे राहणाऱ्या भावकीतीलच रोहिदास नवनाथ सपकाळ व देवईबाई रोहिदास सपकाळ यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे विचारपूस करून पोलिसी खाक्या दाखवताच त्या दोघांनी खून केल्याची कबुली दिली. आरोपीच्या म्हशीचा काही दिवसांपूर्वी मृत्यू झाला होता. यावेळी खून झालेल्या बालकाच्या घरच्यांशी आरोपींचा वाद झाला होता. तुम्ही करणी केल्यामुळे म्हशीचा मृत्यू झाला, असे कारण या भांडणाचे होते. याचाच राग मनात धरून शाळेत खेळण्यासाठी आल्यानंतर बुधवारी सकाळच्या सुमारास शुभम याचा गळा आवळून खून केला व त्याला शाळेच्या आवारात फेकून दिले. याप्रकरणी रोहिदास नवनाथ सपकाळ व त्याची पत्नी देवईबाई रोहिदास सपकाळ या दोघांवर नेकनूर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि केंद्रे करत आहेत.
सर्व परिस्थितीची केली पाहणी
६ वर्षीय बालकाचा खून झाल्यामुळे गावावर शोककळा पसरली होती. तसेच ग्रामस्थ देखील आक्रमक झाले होते. मृतदेह ज्या ठिकाणी आढळला ते ठिकाण व आजूबाजूची घरे याचा अंदाज घेतला तर आरोपीचे घर हे त्या घटनास्थळापासून जवळ असल्याचे दिसून आले. तसेच शुभम हा खेळताना आरोपीच्या घराकडे गेला होता, अशी माहिती सोबत खेळणाऱ्या मुलांनी दिली होती. त्यामुळे संशय बळावला, खुनाचा गुन्हा २४ तासांच्या आत उघडकीस आला, अशी माहिती पोलिसांनी दिली.
एकुलता एक मुलगा गेला
मोतीराम सपकाळ यांना एक ९ वर्षांची मुलगी व ६ वर्षांचा शुभम अशी दोन मुलं होती. दरम्यान, झालेल्या वादातून आपल्या मुलाचा बळी जाईल, याची पुसटशीदेखील कल्पना नसल्यामुळे शुभच्या खुनाने त्याच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. तसेच आरोपींना कडक शासन करावे, अशी मागणी देखील कुटुंबासह ग्रामस्थांनी प्रशासनाकडे केली आहे.