कोरोनाकाळात बालविवाह वाढले; ८० रोखले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:23 IST2021-07-21T04:23:19+5:302021-07-21T04:23:19+5:30
बीड : जिल्ह्याची ओळख ही ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून केली जाते. दरम्यान, कोयता वाढवण्यासाठी लवकरच लग्न करण्यात आल्याचे ...

कोरोनाकाळात बालविवाह वाढले; ८० रोखले
बीड : जिल्ह्याची ओळख ही ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून केली जाते. दरम्यान, कोयता वाढवण्यासाठी लवकरच लग्न करण्यात आल्याचे समोर आलेले आहे. तर, कोरोनाच्या काळात बालविवाहांचे प्रमाण वाढले असून, या काळात जवळपास ८० बालविवाह रोखण्यात यश आले, तर काही प्रकरणांची पोलिसांकडून चौकशी सुरू आहे.
जिल्ह्यातील दीड वर्षांहून अधिक काळ कोरोनामुळे शाळा बंद आहेत. आता ग्रामीण भागात शासनाकडून आठवी ते बारावीच्या वर्गाची शाळा सुरू केली आहे. यावेळी मुलींची पटसंख्या कमी झाल्याचे चित्र काही ठिकाणी दिसून आले आहे. दरम्यान, या काळात ज्यांचे बालविवाह रोखले त्या मुलींना शाळेत पाठवले जात नसल्याचे समोर आले आहे. तर, या तीन महिन्यांच्या काळात जिल्हाभरात जवळपास ८० बालविवाह रोखण्यात प्रशासनाला यश आले आहे. तसेच त्या पालकांचे समुपदेशन करून त्या मुलींच्या शिक्षणाचे महत्त्व देखील यावेळी त्यांना पटवून देण्यात आले असून, विविध योजनांची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे काही ठिकाणी याचा परिणाम सकारात्मक झाला, तर काही प्रकरणांत परगावी पाठवून विवाह केल्याचे समोर आल्याने त्यांची पोलिसांकडून चौकशी सुरू करण्यात आली आहे.
पटसंख्या कमी झालेल्या मुली गेल्या कुठे?
ग्रामीण भागात जिल्हा परिषदेच्या सातवीपर्यंतच्या शाळा असतात. त्यानंतर पुढील शिक्षणासाठी दुसऱ्या गावी जावे लागते. पालक आपल्या मुलींना गावाबाहेर शाळेत पाठविण्यास इच्छुक नसतात. त्यामुळे त्यांच्या विवाहाचे प्रयत्न सुरू होतात.
दहावीच्या विद्यार्थिनींची संख्या घटली?
जिल्ह्यातील ग्रामीण भागातील आठवी ते बारावीच्या शाळा सुरू झाल्या आहेत. दरम्यान, या दहावीच्या पुढील वर्गातील विद्यार्थिनींची संख्या काही प्रमाणात घटली आहे. यासंदर्भात प्रशासनाकडून माहिती घेत कारणे शोधणे गरजेचे आहे.
आर्थिक विवंचना हेच कारण
कोरोना काळात अनेकांचा रोजगार हिरावला, ग्रामीण भागातही हेच चित्र आहे. परिणामी पालक आपली जबाबदारी पूर्ण करण्याची घाई करत होते. ग्रामीण भागात व ऊसतोड कामगारांमध्ये बालविवाहाचे प्रमाण आहे.
एकूण विद्यार्थी उपस्थिती : २,६५२
किती शाळा सुरू : ८०
किती अद्याप बंद : ६७२
कोरोना काळात बालविवाह होत असल्याची माहिती मिळताच त्या गावात जाऊन आम्ही समुपदेशन करून अनेक बालविवाह रोखले आहेत. मात्र, अनेक प्रकरणांत आर्थिक विवंचना व पालकांची बेरोजगारी हेच कारण असल्याचे समोर आले आहे. सर्वांनी सतर्क राहून बालविवाह रोखण्यासाठी प्रयत्न करावेत.
तत्त्वशील कांबळे, बालकल्याण समिती सदस्य, बीड