हातपंप दुरूस्तीसाठी गाडी मिळेल का ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:24 IST2021-02-05T08:24:28+5:302021-02-05T08:24:28+5:30
धारूर : येथील पंचायत समितीकडील हातपंप दुरूस्तीची गाडी किरकोळ दुरूस्ती, विमा भरणा, आर. टी. ओ. फिटनेस व कर्मचारी ...

हातपंप दुरूस्तीसाठी गाडी मिळेल का ?
धारूर : येथील पंचायत समितीकडील हातपंप दुरूस्तीची गाडी किरकोळ दुरूस्ती, विमा भरणा, आर. टी. ओ. फिटनेस व कर्मचारी नसल्यामुळे दहा महिन्यापांसून जिल्हा परिषद, बीड येथे जमा केलेली असून, ती अद्याप परत मिळालेली नाही. मागील सहा महिन्यांपासून सभापती चंद्रकलाताई हनुमंत नागरगोजे यांनी गटविकास अधिकाऱ्यांमार्फत मुख्य कार्यकारी अधिकारी व पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्याशी पत्र व्यवहार केला. परंतु प्रशासन सुस्त अन् जनता त्रस्त झाली आहे. याबाबत आ. प्रकाश सोळंके यांनीही पत्र व्यवहार केलेला आहे. पण, अद्याप हातपंप दुरूस्तीसाठीची गाडी ‘स्टार्ट’ झालेली नाही. त्यामुळे हातपंप दुरुस्तीची गाडी मिळेल का, असे म्हणण्याची वेळ आली आहे.
तालुक्यातील जनतेला पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. हातपंप आहेत. पण नादुरूस्त! दुरूस्तीसाठी गाडी, कर्मचारी नाहीत, ते तत्काळ मिळावेत. यासाठी सभापती चंद्रकलाताई नागरगोजे व उपसभापती प्रकाश कोकाटे यांनी उपोषणाचा मार्ग अवलंबला आहे. ९ फेब्रुवारीपर्यंत हातपंप दुरूस्तीची गाडी व कर्मचारी धारूर पंचायत समितीला मिळाले नाहीत तर १० फेब्रुवारीपासून सभापती व उपसभापती पंचायत समिती सदस्यांसह जिल्हा परिषदेसमोर उपोषणास बसणार आहेत.
याबाबत हनुमंत नागरगोजे व राष्ट्रवादी ओबीसी सेलचे प्रदेश सरचिटणीस प्रा. ईश्वर मुंडे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी व पाणी पुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना निवेदन दिले आहे.