वीज कंपनीच्या दुर्लक्षामुळे केज, धारूरचा पाणीपुरवठा खंडित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:30 IST2021-04-05T04:30:08+5:302021-04-05T04:30:08+5:30
केज : मांजरा धरणातून केज धारूरसह बारागावांना पाणीपुरवठा करणाऱ्या भालगाव येथील विद्युतपंपास कमी दाबाने वीजपुरवठा होत असल्याने विद्युतपंप सतत ...

वीज कंपनीच्या दुर्लक्षामुळे केज, धारूरचा पाणीपुरवठा खंडित
केज : मांजरा धरणातून केज धारूरसह बारागावांना पाणीपुरवठा करणाऱ्या भालगाव येथील विद्युतपंपास कमी दाबाने वीजपुरवठा होत असल्याने विद्युतपंप सतत बंद पडू लागल्याने केज, धारूरसह बारागावचा पाणीपुरवठा गेल्या पंधरा दिवसांपासून बंद आहे. नागरिकांना तालुक्यात धरण असतानाही पाणीटंचाईचा सामना वीज वितरण कंपनीच्या दुर्लक्षित कारभारामुळे करावा लागत आहे. येत्या दोन दिवसांत वीज वितरण कंपनीने पाणीपुरवठा करणाऱ्या विद्युतपंपास पूर्ण क्षमतेने वीजपुरवठा न केल्यास केज येथील विद्युत वितरण कंपनीच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष भाऊसाहेब गुंड यांनी दिला आहे.
केज तालुक्यातील धनेगाव येथील मांजरा धरणातून केज, धारूर शहरासह बारा गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी मांजरा धरणाच्या काठावरील भालगाव येथे विहीर घेण्यात आली आहे. या विहिरीतून विद्युतपंपाद्वारे केज, धारूरसह बारागावांना पाणीपुरवठा करण्यात येतो. मात्र गेल्या पंधरा दिवसांपासून भालगाव येथील पाणीपुरवठा करणाऱ्या विद्युतपंपास कमी दाबाने वीजपुरवठा केला जात असल्याने हा पंप सतत बंद पडू लागला आहे. हा विद्युतपंप चालू केल्यानंतर केज येथील जलशुद्धिकरण केंद्रात पाणी येण्यास तीन ते साडेतीन तासांचा अवधी लागतो. मात्र पंप सतत बंद पडत असल्याने जलशुद्धिकरण केंद्रात पाणी येत नाही. परिणामी कमी विद्युत दाबामुळे पंप सतत चालू बंद होत असल्याने पाण्याच्या कमी जास्त दाबाने पाणीपुरवठा करणारी पाइपलाइन फुटण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे.
भालगाव येथील पाणीपुरवठा करणाऱ्या विद्युतपंपास पूर्ण क्षमतेने वीजपुरवठा करण्यात यावा, अशी मागणी तहसीलदार केज व सहायक अभियंता राजेश आंबेकर यांच्याकडे करूनही त्यांनी यांच्याकडे दुर्लक्ष केल्याने केज धारूर शहराचा पाणीपुरवठा गेल्या पंधरा दिवसांपासून बंद असल्याचे भाऊसाहेब गुंड म्हणाले.
पाणीपुरवठा करणाऱ्या भालगाव येथील योजनेचा वीजपुरवठा सुरळीत न करणाऱ्या विद्युत वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांची पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे तक्रार करण्यात येणार असून, येत्या दोन दिवसांत पाणीपुरवठा करणाऱ्या योजनेच्या विद्युतपंपास पूर्ण क्षमतेने वीजपुरवठा न केल्यास राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने केज येथील विद्युत वितरण कंपनीच्या कार्यालयावर मोर्चा काढणार असल्याचे गुंड यांनी लोकमतला सांगितले.