प्रचार नियोजनात कारभारी ‘बिझी’
By Admin | Updated: October 6, 2014 00:14 IST2014-10-05T23:53:02+5:302014-10-06T00:14:37+5:30
प्रताप नलावडे ,बीड निवडणुकीच्या प्रचारात उमेदवार प्रचारसभा आणि मतदारांच्या गाठीभेटी घेण्यात ‘बिझी’ असतानाच त्यांच्या अपरोक्ष त्यांची संपूर्ण यंत्रणा सांभाळणारे राजकारणातले कारभारी

प्रचार नियोजनात कारभारी ‘बिझी’
प्रताप नलावडे ,बीड
निवडणुकीच्या प्रचारात उमेदवार प्रचारसभा आणि मतदारांच्या गाठीभेटी घेण्यात ‘बिझी’ असतानाच त्यांच्या अपरोक्ष त्यांची संपूर्ण यंत्रणा सांभाळणारे राजकारणातले कारभारी पडद्याआडून सारा कारभार पाहत असल्याचे दिसत आहे.
दररोजच्या उमेदवारांच्या सभेचे नियोजन करणे, आवश्यक परवानगी काढणे, कागदपत्रांची पुर्तता करणे, कार्यकर्त्यांशी डे-टू डे संपर्क ठेवणे, अशी अनेक कामांचे नियोजन निवडणुकीच्या प्रचारादरम्यान करावे लागते.
केज मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार नमिता मुंदडा यांची संपूर्ण प्रचार यंत्रणा त्यांचे पती अक्षय मुंदडा आणि सासरे नंदकिशोर मुंदडा हे सांभाळत आहेत. काँग्रेसच्या उमेदवार अंजली घाडगे यांच्या दररोजच्या नियोजनाचा भार युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस राहूल सोनवणे यांच्यावर आहे. भाजपाच्या उमेदवार संगीता ठोंबरे यांच्या प्रचाराचे नियोजन त्यांचे पती विजयप्रकाश हे सांभाळत आहेत. शिवसेनेच्या कल्पना नरहिरे यांच्या या सर्व महिला उमेदवार प्रचारात बिझी असल्या तरी त्यांच्या दिवसभराच्या कामाचे नियोजन करण्यात ही मंडळीही बिझी आहेत.
परळी मतदारसंघात तिरंगी लढत होत आहे. भावा-बहिणीमध्ये आमने सामने होत असलेल्या लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष वेधले आहे. राष्ट्रवादीचे उमेदवार धनंजय मुंडे यांच्या प्रचाराची यंत्रणा वाल्मिक कराड, नितीन कुलकर्णी आणि प्रशांत जोशी या तिघांनी पेलली आहे. भाजपाच्या उमेदवार पंकजा मुंडे यांच्या प्रचाराची यंत्रणा भाजपाचे शहर अध्यक्ष आणि माजी नगराध्यक्ष जुगलकिशोर लोहिया यांच्या खांद्यावर आहे. लोहिया यांनी यापूर्वी गोपीनाथ मुंडे यांच्या अनेक निवडणुकांमध्ये प्रचार यंत्रणा सांभाळली आहे. पंकजा यांच्या ग्रामीण भागातील प्रचाराची यंत्रणा भाजपाचे माजी तालुका अध्यक्ष श्रीहरी मुंडे यांच्या हाती आहे. पंकजा आणि लोकसभेच्या उमेदवार डॉ. प्रीतम मुंडे यांच्या प्रचाराची यंत्रणा सांभाळणे आणि एकूण सर्वच नियोजन करण्यात भाजपाचे जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे सध्या बिझी आहेत. काँग्रेसचे उमेदवार टी.पी. मुंडे यांच्या प्रचाराची यंत्रणा त्यांचे चिरंजीव प्रा. विजय मुंडे, आत्माराम कराड आणि रविंद्र गित्ते यांच्याकडे आहे.
माजलगाव मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार प्रकाश सोळंके यांच्या प्रचार यंत्रणेचे संपूर्ण नियोजन करण्याची जबाबदारी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नितीन नाईकनवरे हे सांभाळत आहेत तर जयसिंह सोळंके हे त्यांना या कामात मदत करीत आहेत. भाजपाचे उमेदवार आर.टी. देशमुख यांच्या नियोजनाची जबादारी डॉ. प्रकाश आनंदगावकर यांच्याकडे आहे.
गेवराई मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार बदामराव पंडित यांच्या प्रचार यंत्रणेचे सूत्र त्यांचे चिरंजीव युध्दाजित पंडित, पुतणे आणि जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विजयसिंह पंडित यांच्याकडे आहेत. या सर्व प्रचार नीतीवर आ. अमरसिंह पंडित हे लक्ष ठेऊन आहेत. भाजपाचे उमेदवार अॅड. लक्ष्मण पवार यांच्या प्रचाराचे नियोजन त्यांचे बंधू शाम पवार यांच्याकडे आहे.
बीड मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार जयदत्त क्षीरसागर यांच्या संपूर्ण प्रचार यंत्रणेचे नियोजन नगरपालिकेतील गटनेते डॉ.भारतभूषण क्षीरसागर, गजानन साखर कारखान्याचे चेअरमन रवींद्र क्षीरसागर आणि सभापती संदीप क्षीरसागर हे पाहत आहेत. भाजपाचे उमेदवार विनायक मेटे यांच्या प्रचाराची धुरा शिवसंग्रामचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के सांभाळत आहेत.