व्यावसायिक आर्थिक संकटात; विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:34 IST2021-04-04T04:34:55+5:302021-04-04T04:34:55+5:30
गेल्या वर्षभरापासून कोरोना संसर्ग सातत्याने सुरूच आहे. कोरोनाच्या धास्तीमुळे शैक्षणिक नुकसान मोठ्या प्रमाणात वाढत चालले आहे. गेल्या वर्षभरात शाळा ...

व्यावसायिक आर्थिक संकटात; विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान
गेल्या वर्षभरापासून कोरोना संसर्ग सातत्याने सुरूच आहे. कोरोनाच्या धास्तीमुळे शैक्षणिक नुकसान मोठ्या प्रमाणात वाढत चालले आहे.
गेल्या वर्षभरात शाळा सुरू करण्यासाठी निर्णय घेताना शासनाला सहा महिन्यांचा कालावधी लागला. अखेर १२ वी व १० वी चे वर्ग काही दिवस सुरू राहिले. पाचवी ते आठवीला परवानगी देताच पुन्हा दुसरी लाट सुरू झाली. वर्षानुवर्षे शाळेत बसून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अचानकच ऑनलाईन शिक्षण घ्यावे लागले. शहरी भागात याला प्रतिसाद मिळत असला तरी ग्रामीण भागात ऑनलाईन शिक्षण ही संकल्पनाच जिकिरीची आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थी ऑनलाईन शिक्षणापेक्षा शेतीच्या कामातच मोठ्या प्रमाणात गुंतवून राहिल्याने त्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान झाले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या भविष्याची चिंता व त्यांचे भवितव्य काय, असा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
विद्यार्थ्यांपाठोपाठ व्यावसायिकही मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. कोरोनाच्या पहिल्या लाटेत सक्तीने तीन महिने व्यवसाय बंद राहिले. परिणामी बाजारपेठेत मोठी आर्थिक मंदी निर्माण झाली. दुकानाचे भाडे, वीज बिल, कामगारांचा पगार व गुंतविलेल्या भांडवलाचे व्याज या चक्रातच व्यापारी अडकत गेला. सर्व सणांवर कोरोनामुळे निर्बंध लादले गेले. त्यामुळे बाजारपेठेत शुकशुकाट राहिला. सर्वच व्यवसाय मोठ्या प्रमाणात मंदावले. पहिल्या कोरोना लाटेतून सावरण्याची स्थिती निर्माण होत असताना पुन्हा कोरोनाची दुसरी लाट आली. या दुसऱ्या लाटेत तर पुन्हा व्यापाऱ्यांची मोठी आर्थिक कोंडी झाली. शासनाच्या दररोजच्या वेगवेगळ्या निर्बंधामुळे व्यापाऱ्यांना कधी दुकाने उघडायची व कधी बंद करायची. यातच त्यांचा वेळ जाऊ लागला. भांडवलाचे व्याजही भरणे मोठ्या मुश्किलीचे झाले आहे. व्यवसाय मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. एकंदरीत कोरोनाच्या लाटेने व्यावसायिक, विद्यार्थी यांच्यासमोर मोठे संकट निर्माण केले आहे.