गाय विक्रीचे पैसे मागणाऱ्या शेतकऱ्याला जिवंत जाळले; पाटोदा येथील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2018 16:33 IST2018-03-13T16:33:05+5:302018-03-13T16:33:37+5:30
तालुक्यातील येवलवाडी (नागरगोजे ) येथील शेतकऱ्याने गाईच्या विक्रीचे पैसे मागितल्याचा राग आल्याने त्यास जिवंत जाळण्याचा प्रकार समोर आला आहे.

गाय विक्रीचे पैसे मागणाऱ्या शेतकऱ्याला जिवंत जाळले; पाटोदा येथील घटना
पाटोदा ( बीड ) : तालुक्यातील येवलवाडी (नागरगोजे ) येथील शेतकऱ्याने गाईच्या विक्रीचे पैसे मागितल्याचा राग आल्याने त्यास जिवंत जाळण्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पाटोदा पोलिस अधिक तपास करत आहेत.
याबाबत पाटोदा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अरुण डोंगरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, येवलवाडी (६६ ) येथील शेतकरी आश्रुबा नागरगोजे यांनी गावातीलच भास्कर नागरगोजे यांना महिनाभरापूर्वी आपली गाय विकली होती. हा सौदा ४० हजाराचा झाला होता. मात्र, भास्कर यांना हा सौदा मान्य नव्हता. याप्रकरणी गावात बैठक घेऊन तडजोडी अंती भास्कर यांनी ३२ हजार रुपये अश्रुबा यांना देण्याचे ठरले. याच रक्कमेची मागणी करण्यासाठी अश्रुबा काल सकाळी भास्कर यांच्या घरी गेले होते. यावेळी रक्कम न देता पुन्हा उद्भवलेल्या वादातून भास्कर यांच्या कुटुंबाने मिळून अश्रुबा यांच्यावर रॉकेल टाकून त्यांना जिवंत जाळले.
यानंतर अश्रुबा यांना बीड येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरु असतानाच त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी अश्रुबा यांच्या मृत्युपूर्व जवाबानुसार कैलास भास्कर नागरगोजे, सुदामती भास्कर नागरगोजे, भास्कर निवृत्ती नागरगोजे, सविता कैलास नागरगोजे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.