कडा परिसरात घरफोड्यांचे सत्र सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:35 IST2021-08-23T04:35:35+5:302021-08-23T04:35:35+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कडा : रात्री-अपरात्री किंवा पहाटेच्या गाढ झोपेत असताना आजवर अनेक चोऱ्या, घरफोड्या कडा परिसरात झालेल्या आहेत. ...

कडा परिसरात घरफोड्यांचे सत्र सुरूच
लोकमत न्यूज नेटवर्क
कडा : रात्री-अपरात्री किंवा पहाटेच्या गाढ झोपेत असताना आजवर अनेक चोऱ्या, घरफोड्या कडा परिसरात झालेल्या आहेत. याचा बोटावर मोजता येईल एवढा तपास लागला असला तरी मागील काही महिन्यांपासून आष्टी, अंभोरा पोलिसांच्या दुर्लक्षामुळे आता भरदिवसा घरफोडीचे सत्र सुरूच आहे. याकडे मात्र पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे.
आष्टी व अंभोरा पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या गावांत आजवर अनेक ठिकाणी रात्री-अपरात्री घरफोड्या व चोरीच्या घटना घडल्या आहेत. परंतु पोलिसांना चोरांच्या मुसक्या आवळण्यात यश आले नाही. आता तर शेती उद्योगाची लगबग असल्याने गावात व वस्तीवर राहत असलेली कुटुंबे शेतात काम करीत आहेत. यावेळी घराला कुलूप असल्याचा फायदा घेऊन चोरटे दिवसा घरफोड्या करीत आहेत.
खडकत, चिंचपूर, टाकळी अमिया, कुंभेफळ, कारखेल बुद्रुक, डोंगरगण, पाटण सांगवी, धानोरा, अंभोरा, सांगवी आष्टी, शेरी बुद्रुक, कडा, शिरापूर, फत्तेवडगांव, आष्टी शहरात चोरीच्या घटना घडल्या आहेत. तरीही पोलिसांना चोरट्यांचा तपास लागला नाही. यासाठी पोलिसांनी स्वतंत्र पथकाची नियुक्ती करून चोरट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शिवसंग्रामचे तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर चौधरी यांनी केली आहे.
...
काय म्हणतात पोलीस अधिकारी..
अंभोरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गावात ग्रामसुरक्षा दल स्थापन करण्यात येणार आहे. ग्रामपंचायतनिहाय सीसीटीव्ही कॅमेर बसवावेत, यासाठी पाठपुरावा सुरू आहे. यासाठी जनजागृती करण्याचे काम सुरू आहे, असे अंभोरा पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर कुकलारे यांनी सांगितले.
....
आष्टी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ज्या गावात चोरीच्या घटना घडल्या आहेत अशांसाठी जनजागृतीसह दक्षता फलक लावले जाणार आहेत. सरपंच, ग्रामपंचायत सदस्यांना याबाबत दक्ष राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. गावात आलेल्या अनोळखी व्यक्तीची देखील माहिती देण्यास गावपातळीवर सांगण्यात आले आहे. चोरीचे प्रकार रोखण्यासाठी पोलीस सतर्क आहेत, असे आष्टी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सलिम चाऊस यांनी सांगितले.