धारुर परिसरात अज्ञात हिंस्त्र पशूकडून म्हशीचा फडशा; शेतकऱ्यांत दहशत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2020 13:27 IST2020-12-18T13:26:32+5:302020-12-18T13:27:41+5:30
सध्या जिल्ह्यात बिबट्याचा धुमाकूळ असल्याने सर्वत्र दहशतीचे वातावरण आहे.

धारुर परिसरात अज्ञात हिंस्त्र पशूकडून म्हशीचा फडशा; शेतकऱ्यांत दहशत
धारूर : शहरापासून जवळच असलेल्या गोपाळपुर शिवारात अज्ञात प्राण्यांने शेतकऱ्यांच्या गोठ्यावर बांधलेल्या म्हशीचा फडशा पाडला आहे. नुकतेच जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात बिबट्याने धुमाकूळ घातला होता. या पार्श्वभूमीवर ही घटना समजताच परिसरातील शेतकऱ्यांत दहशत पसरली आहे.
शहरातील शेतकरी आवेज हाजी अब्दूल रशीद कुरेशी यांची गोपाळपूर शिवारात शेती आहे. या शेतावर गायी, म्हशी, बैल असा बैलबारदाना गोठ्यात आहे. दि.१६ च्या रात्री या गोठ्याच्या परिसरात बांधलेल्या म्हशीला अज्ञात प्राण्याने फस्त केल्याची घटना घडली. याबाबत कुरेशी यांनी प्रशासनाकडे तक्रार दाखल केली आहे. पशूवैद्यकीय अधिकाऱ्याकडून घटनेचा पंचनामा करुन शवविच्छेदन करण्यात आले. सध्या जिल्ह्यात बिबट्याचा धुमाकूळ असल्याने सर्वत्र दहशतीचे वातावरण आहे. याच काळात सदरील घटना घडल्याने परिसरातील शेतकऱ्यांत भिती पसरली आहे. महिनाभरातील ही तिसरी घटना असल्याचे कुरेशी यांनी म्हटले असून शासनाने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली आहे. यापुर्वीही जहागीर मोहा येथे अज्ञात प्राण्याने तब्बल २४ शेळ्या मारल्याची घटना काही दिवसांपुर्वी घडली होती.