कष्टाने पिकविलेल्या मिरचीला बाजारपेठ मिळवून द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:30 IST2021-04-12T04:30:41+5:302021-04-12T04:30:41+5:30
धारुर : ढगेवाडी येथे कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली चार तरूण शेतकऱ्यांनी मिरची पिकाची लागवड केली असून, हे पीक नवीन ...

कष्टाने पिकविलेल्या मिरचीला बाजारपेठ मिळवून द्या
धारुर
: ढगेवाडी येथे कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली चार तरूण शेतकऱ्यांनी मिरची पिकाची लागवड केली असून, हे पीक नवीन असताना जोमात आहे. संकट काळात कृषी विभागाने बाजारपेठ उपलब्ध करून योग्य भाव मिळवून द्यावा, असे साकडे शेतकऱ्यांनी घातले आहे.
बदलत्या शेती तंत्राची माहिती व आवश्यक मार्गदर्शन कृषी विभागाकडून केले जात असल्याने धारुर तालुक्यातील शेतकरी आता पारंपरिक पिकांना फाटा देत आधुनिक पद्धतीने शेती करत आहेत. तालुक्यातील ढगेवाडी येथील बालासाहेब ढगे, अशोक अंडिल, शामराव अंडील यांनी २५ जानेवारी दरम्यान जवळपास चार एकर क्षेत्रात मिरची लागवड केली. उन्हाळ्याचे दिवस असूनही या पिकाची वाढ जोमदार चालू आहे. कृषी सहाय्यक श्रीनिवास अंडिल यांच्या मार्गदर्शनाखाली कीड, खत तसेच पाणी व्यवस्थापनाचे नियोजन करीत या शेतकऱ्यांनी डोंगराळ भागात मिरची फुलविली आहे. बदलते हवामान, कोरोनामुळे विस्कळीत झालेली विक्री व्यवस्था अशी संकटे असतानाही न डगमगता शेतकरी शेती करीत आहेत. उत्पादनालाही सुरुवात झाली असून, चांगले उत्पादन निघेल, पण मालाची विक्री होण्यासाठी शासनाने शेतकऱ्यांना सहकार्य करावे, अशी भावना शेतकरी व्यक्त करीत आहेत. विद्युत महावितरणने आठ तास का होईना पण योग्य दाबाने वीज पुरवठा करावा, अशी मागणीही शेतकऱ्यांनी केली आहे.
===Photopath===
110421\11bed_1_11042021_14.jpg