नगराध्यक्ष व उपाध्यक्षांच्या वादात पुलाचे काम रखडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:22 IST2021-02-05T08:22:22+5:302021-02-05T08:22:22+5:30
माजलगाव : शहरातील प्रभाग एकमध्ये असलेल्या संभाजीनगर येथे मागील एक वर्षापासून पूल तुटल्याने पादचाऱ्यांना चालणे अवघड झाले ...

नगराध्यक्ष व उपाध्यक्षांच्या वादात पुलाचे काम रखडले
माजलगाव : शहरातील प्रभाग एकमध्ये असलेल्या संभाजीनगर येथे मागील एक वर्षापासून पूल तुटल्याने पादचाऱ्यांना चालणे अवघड झाले असतांना केवळ नगराध्यक्ष व उपाध्यक्षांच्या वादात हे काम रखडले असल्याने आता या भागातील नागरिक आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.
शहरातील संभाजी चौक भागात संभाजी नगर हा भाग नवीन असून हा भाग प्रभाग एकमध्ये येतो. नगरपालिकेच्या उपाध्यक्षा सुमनबाई मुंडे व पाणी पुरवठा सभापती शरद यादव यांचा हा प्रभाग येतो. या भागातील नागरिक नगरपालिकेला मोठ्या प्रमाणावर कर भरत असताना या भागाचा विकास मात्र शून्य आहे. या भागात रस्ते, नाल्या, स्ट्रीटलाईट व नळ योजना झालेली नाही. यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणावर अडचणींचा सामना करावा लागत आहे. या भागात असलेल्या नाल्या न झाल्याने जागोजागी घाण पाणी व घाणीचे साम्राज्य पसरले असताना याकडे कोणाचेही लक्ष दिसून येत नाही. यामुळे या भागात दुर्गंधी पसरली असून डासांचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव दिसून येत आहे.
एक वर्षापूर्वी या ठिकाणी नालीवर पूल बांधण्यात आला होता. तो पूल केवळ एका आठवड्यात ढासळला. तेव्हापासून हा पूल बांधण्यासाठी या भागातील नागरिक नगरपालिका व पदाधिकाऱ्यांकडे मागणी करीत होते. मात्र, याकडे कोणीही लक्ष दिले नाही. यामुळे या भागात जाणाऱ्या नागरिकांना चालणे अवघड झाले असून वाहने नेता येत नाहीत. यामुळे या नालीत दररोज कोणीना कोणी पडत आहे. यामुळे या भागातील नागरिक दोन्ही नगरसेवक व नगराध्यक्षांना विनवण्या करून थकले आहेत. आता एका आठवड्यात या भागातील कामे पूर्ण न झाल्यास आंदोलनाचा इशारा या भागातील नागरिकांनी दिला आहे.
संभाजी नगर भागातील पूल बांधकाम करण्यासाठी संबंधित गुतेदाराला नगरपालिकेकडून वर्क ऑर्डर देण्यात आली नसल्याने या भागातील काम रखडले आहे. विना वर्कऑर्डर काम करण्यास नगराध्यक्ष विरोध करतात.
-दीपक मुंडे, उपनगराध्यक्षांचे प्रतिनिधी
संभाजी नगर भागातील नाली व पूल करण्यासाठी मुख्याधिकाऱ्यांनी उपनगराध्यक्ष व नगर सेवकांकडे वर्कऑर्डर देऊनही काम सुरू केले नाही. त्यांनी काम न केल्यास मी इतर एजन्सीकडून काम करून घेणार आहे. --- शेख मंजुर, नगराध्यक्ष
या भागातील नाली बांधकाम दोन दिवसांत सुरू करण्यात येईल.
-- शरद यादव, पाणी पुरवठा सभापती