वाढीव वीजदर कमी करण्याची मागणी
अंबाजोगाई - कोरोनाच्या संक्रमण काळात महावितरणच्या वतीने छुप्या पद्धतीने वीज दर वाढविण्यात आले आहेत. वीज बिलांच्या रकमा मोठ्या प्रमाणात वाढत चालल्या आहेत. शासनाने कोरोनाच्या काळात वीज बिल तर माफ केलेच नाही. उलट वाढीव दर ठरवून वीज आकारणी सुरू केली आहे. वाढते वीज बिल ग्राहकांना परवडणारे नाही. यासाठी रीडिंग प्रमाणे बिल देऊन इतर अधिभार रद्द करावेत. अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते मिलिंद कऱ्हाडे यांनी केली आहे.
कोरोनामुळे व्यापाऱ्यांना फटका
अंबाजोगाई - अंबाजोगाई तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या आता कमी झाली आहे. तरीही प्रशासनाने अनेक निर्बंध लावले आहेत. सध्या सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे व्यापाऱ्यांना सकाळी ७ ते दुपारी ४ वाजेपर्यंत दुकाने उघडण्याची मुभा दिली असली तरी शहरातील व्यापाऱ्यांचे व्यवसाय मोठ्या प्रमाणात मंदावले आहेत. कोरोनाच्या धास्तीमुळे अनेक ग्राहकांनी बाजारपेठेकडे पाठ फिरवल्याने व्यापारी संकटात सापडले आहेत.
बसफेऱ्या बंद असल्याने ग्रामीण जनता हैराण
अंबाजोगाई - लॉकडाऊन झाल्यानंतर ही ग्रामीण भागातील बससेवा अजूनही सुरू झालेली नाही.
लॉकडाऊनच्या काळात बस वाहतूक सेवा पूर्णत: बंद ठेवण्यात आली होती.मात्र आता शासनाने ग्रामीण भागातील नागरिकांना शहरात रुग्णालयात येण्यासाठी वाहनांची सुविधा उपलब्ध करावी. इतर वाहनांनाही बंदी करण्यात आल्याने व बसफेऱ्या बंद असल्याने रुग्णालयापर्यंत जायचे कसे? असा प्रश्न ग्रामस्थांसमोर निर्माण झाला आहे. बसफेऱ्या बंद झाल्याचा मोठा फटका ग्रामीण भागाला बसू लागला आहे.
प्रोत्साहन रक्कम कधी होणार जमा
अंबाजोगाई - राज्य शासनाने नियमित कर्जाचा भरणा करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन रक्कम जमा करण्याचे आश्वासन दिले होते. एक वर्षे लोटून गेल्यानंतर ही अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा झालेली नाही. ती तातडीने दाखल करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते प्रभाकर कुलकर्णी यांनी केली आहे.