आश्वासनानंतर मृतदेह घेतला ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:48 IST2021-01-08T05:48:46+5:302021-01-08T05:48:46+5:30
सखाराम शिंदे गेवराई : आपल्या शेतातील विद्युत मोटार सुरू करण्यासाठी जात असलेल्या रुस्तुम बाळकृष्ण मते (वय ५५, रा. गंगावाडी) ...

आश्वासनानंतर मृतदेह घेतला ताब्यात
सखाराम शिंदे
गेवराई : आपल्या शेतातील विद्युत मोटार सुरू करण्यासाठी जात असलेल्या रुस्तुम बाळकृष्ण मते (वय ५५, रा. गंगावाडी) या शेतकऱ्यास राक्षसभुवनहून गेवराईकडे भरधाव येणाऱ्या अवैध वाळूच्या हायवाने चिरडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना राक्षसभुवन गेवराई रोडवरील गंगावाडीजवळ अमृता नदीच्या पुलाजवळ ४ जानेवारी रोजी सकाळी ७ च्या सुमारास घडली. अपघातात जबाबदार असलेल्या तलाठी, पोलीस यांना निलंबित करावे मगच अंत्यसंस्कार करू अशी भूमिका घेत रस्त्यावर तब्बल सात तास ठिय्या मांडला होता.
ही घटना कळल्यानंतर नातेवाईक व गावांतील नागरिक घटनास्थळी जमा झाले. तब्बल सात तास म्हणजे सकाळी सात ते दुपारी दोन वाजेपर्यंत मृतदेहासह नातेवाईक व गावातील नागरिक रस्त्यावर ठिय्या मांडत आक्रमक झाले होते. या ठिकाणी उपविभागीय अधिकारी नामदेव टिळेकर, प्रभारी तहसीलदार श्यामसुंदर रामदासी, पोलीस उपविभागीय अधिकारी स्वप्नील राठोड, पोलीस उपनिरीक्षक संदीप काळे, युवराज टाकसाळसह अनेक जण उपस्थित होते. अधिकारी यांनी नातेवाईक व गावातील नागरिकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, नातेवाईक अधिकच आक्रमक झाले. हप्तेखोर अधिकारी व कर्मचारी निलंबित झालेच पाहिजेत, जिल्हाधिकारी आल्याशिवाय उठणार नाही व अंत्यसंस्कार करणार नाही, अशा घोषणा देत होते. संबंधित तलाठी व पोलीस यांची चौकशी करून निलंबित करण्यात येईल, तसेच स्व. गोपीनाथ मुंडे अपघात विमा मंजुरीसाठी देण्यात येईल. अपघातातील हायवा निष्पन्न करून चालकावर गुन्हा दाखल करण्यात येईल, असे लेखी पत्र उपविभागीय अधिकारी नामदेव टिळेकर, उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्नील राठोड यांनी नातेईईकांना दिल्यानंतर नातेवाईक शांत झाले व मृतदेह ताब्यात घेऊन घरी गेले.
रुस्तुम मते यांच्याकडे फक्त तीन एकर शेती आहे. घरात पत्नी, मुलगा, चार मुली असून सर्वांची लग्ने झालेली आहेत. सर्व काही शेतीवरच अवलंबून असल्याने फक्त शेतीच करून उदरनिर्वाह करत होते.
नातेवाइकांच्या भावना लक्षात घेऊन संबंधित तलाठी व पोलीस यांची चौकशी करून दोषी आढळल्यास निलंबित करण्यात येईल, असे लेखी दिल्यानंतर ठिय्या आंदोलन मागे घेऊन मृतदेह ताब्यात घेतला असल्याचे उपविभागीय अधिकारी नामदेव टिळेकर यांनी सांगितले.