गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी मृतदेह आणला ठाण्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:21 IST2021-06-27T04:21:54+5:302021-06-27T04:21:54+5:30
गेवराई : हुंड्यातील राहिलेले दोन लाख रुपये घेऊन यावेत तसेच सततच्या मानसिक व शारीरिक छळालला कंटाळून विषारी द्रव ...

गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी मृतदेह आणला ठाण्यात
गेवराई : हुंड्यातील राहिलेले दोन लाख रुपये घेऊन यावेत तसेच सततच्या मानसिक व शारीरिक छळालला कंटाळून विषारी द्रव घेतलेल्या विवाहितेचा औरंगाबाद येथील खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान शुक्रवारी सकाळी मृत्यू झाला. रात्री १० वाजण्याच्या सुमारास मृतदेह रुग्णवाहिकेतून थेट येथील गेवराई पोलीस ठाण्यात आणून माहेरच्या लोकांनी ठिय्या मांडला. याप्रकरणी विवाहितेचा छळ करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी शनिवारी पहाटे गेवराई पोलीस ठाण्यात पती, सासू, सासरा आणि दीर या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
शहरातील सिद्धीविनायक नगर भागात राहणाऱ्या राठोड कुटुंबातील कांचन ऊर्फ कविता विशाल राठोड (२६) हिचा विवाह विशाल राठोड सोबत २०१७ मध्ये झाला होता. लग्नातील राहिलेले हुंड्याचे दोन लाख रुपये घेऊन यावेत तसेच तुला घरातील काम व स्वयंपाक येत नाही, असे म्हणत शिवीगाळ व मारहाण करून तिचा मानसिक व शारीरिक छळ सासरच्या मंडळीकडून केला जात असे. या त्रासाला कंटाळून ९ जून रोजी कांचन राठोड हिने राहत्या घरी विषारी द्रव प्राशन केले होते. तिच्यावर औरंगाबाद येथील खासगी रुग्णालयात पंधरा दिवसांपासून उपचार सुरू होते. उपचारादरम्यान शुक्रवारी तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी मयत विवाहितेचे वडील बाबूराव घनसिंग चव्हाण (रा. माळतांडा मोगरा, ता.माजलगाव) यांच्या फिर्यादीवरून गेवराई पोलीस ठाण्यात पती विशाल साहेबराव राठोड, सासरा साहेबराव गोपीनाथ राठोड, सासू मंगलाबाई साहेबराव राठोड व दीर प्रतीक साहेबराव राठोड (सर्व रा. गेवराई) यांच्याविरुद्ध गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस उपनिरीक्षक मनीषा जोगदंड या करीत आहेत. या प्रकरणातील आरोपी फरार आहेत.
( चौकट )
आमच्या मुलीला सासरच्या लोकांनी विषारी द्रव पाजून मारल्याचा आरोप करीत सासरच्या लोकांविरुद्ध गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करीत मयत विवाहितेच्या माहेरच्या लोकांनी शुक्रवार रात्री १० वाजण्याच्या सुमारास मृतदेह रुग्णवाहिकेतून थेट गेवराई येथील पोलीस ठाण्यात आणला होता. गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी नातेवाइकांनी ठिय्या मांडला होता. शनिवारी पहाटेच्या सुमारास गुन्हा दाखल झाल्यानंतर नातेवाइकांनी मृतदेह नेला.
===Photopath===
260621\sakharam shinde_img-20210626-wa0013_14.jpg