चार दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या नवविवाहितेचा मृतदेह आढळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:22 IST2021-06-23T04:22:52+5:302021-06-23T04:22:52+5:30
परळी : येथील वडसावित्रीनगर भागात नऊ महिन्यांपूर्वी विवाह झालेल्या विवाहितेचा मृतदेह एका विहिरीत सोमवारी रात्री आढळून आला. तिच्या ...

चार दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या नवविवाहितेचा मृतदेह आढळला
परळी : येथील वडसावित्रीनगर भागात नऊ महिन्यांपूर्वी विवाह झालेल्या विवाहितेचा मृतदेह एका विहिरीत सोमवारी रात्री आढळून आला. तिच्या वडिलांच्या तक्रारीनंतर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सासरकडील चौघांविरुद्ध परळी शहर पोलीस ठाण्यात मंगळवारी दुपारी गुन्हा दाखल झाला. दरम्यान, विवाहितेच्या पतीस शहर पोलिसांनी अटक केली आहे.
याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, परळी शहरातील वडसावित्रीनगर भागातील कोमल सोमनाथ पडुळकर (वय १९) हिचा नऊ महिन्यांपूर्वी विवाह झाला होता. १९ जून रोजी पहाटे ६ वाजेपासून ती घरातून बेपत्ता असल्याची नोंद शहर पोलिसांकडे करण्यात आली होती. दरम्यान, वडसावित्रीनगर भागातील एका विहिरीत तिचा मृतदेह तरंगताना आढळून आला. शहर ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंत कदम, सपोनि खरात, जमादार गोविंद बडे, तुकाराम मुरकुटे, नवनाथ हरगावकर यांनी २१ रोजी घटनास्थळाची पाहणी केली. ओळख पटवून उत्तरीय तपासणीसाठी विवाहितेचा मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात आणला.
२२ रोजी सकाळी ११ वाजता येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन झाले. दरम्यान, धारूर तालुक्यातील आडस येथील माहेरच्या लोकांनी कोमलच्या मृत्यूवर संशय व्यक्त करीत सर्व आरोपींना अटकेची मागणी करीत सायंकाळी ६ वाजेपर्यंत मृतदेह स्वीकारण्यास नकार दिला होता, तसेच शहर पोलीस ठाण्यात ठिय्या केला. घटनेच्या पार्श्वभूमीवर उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील जायभाये यांनी परळी पोलीस ठाण्यास भेट दिली. संशयित आरोपी म्हणून मयत महिलेच्या पतीला अटक केली.
दरम्यान, माहेरून हुंड्यातील राहिलेले हुंड्याचे वीस हजार रुपये व मोटरसायकल घेण्यासाठी तीस हजार रुपये घेऊन ये असे म्हणून सासरकडील मंडळींनी कोमल हिस मानसिक त्रास देऊन आत्महत्येस प्रवृत्त केल्याची तक्रार संजय रघुनाथ पवार (रा. आडस) यांनी परळी शहर पोलीस ठाण्यात दिली. त्यानुसार विवाहितेचा पती सोमनाथ बालासाहेब पडुळकर, सासरा बालासाहेब पडुळकर, सासू मंगल पडुळकर, नणंद उषा मच्छिंद्र चव्हाण या चौघांविरुद्ध हुंडाबळीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
===Photopath===
220621\22_2_bed_14_22062021_14.jpg~220621\22_2_bed_13_22062021_14.jpg
===Caption===
कोमल पडुळकर (मयत विवाहिता)~परळीत मयत विवाहितेच्या नातेवाइकांचा पोलीस ठण्यासमोर ठिय्या