बीड : विधानसभेत १२ आमदारांच्या निलंबन केल्याचे पडसाद बीड जिल्ह्यात मंगळवारी उमटले. निलंबनाच्या निषेधार्थ भाजपच्या वतीने ठिकठिकाणी आंदोलन करुन महाविकास आघाडी सरकारचा निषेध नोंदविला. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने इंधन दरवाढ बद्दल जिल्ह्यात ठिकठिकाणी मोर्चे, रास्ता रोको, निदर्शने करण्यात आली.
मंगळवारी परळीत राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे अच्छे दिनाची प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढत गॅस दरवाढीविरोधात रस्त्यावर चूल मांडून भाकरी भाजून निदर्शन केली. यावेळी केंद्र सरकारच्या धोरणांचा निषेध केला. वडवणी, धारूर येथे राष्ट्रवादीच्या वतीने रास्ता रोको आंदोलन केले. दरम्यान, सोमवारीही राष्ट्रवादीकडून जिल्ह्यात इंधन, गॅस दरवाढीविरोधात आंदोलन करण्यात आले होते.
आष्टी येथे भाजप आमदारांच्या निलंबन केल्याच्या निषेधार्थ महाविकास आघाडी सरकारचा भाजपकडून निषेध करुन नायब तहसीलदार शारदा दळवी यांना निवेदन दिले. यावेळी राज्य सरकार विरोधी घोषणाबाजी केली. अंबाजोगाई, माजलगाव, गेवराई येथेही आमदारांच्या निलंबनाचा निषेध नोंदवून तहसीलदारांना निवेदन दिले. आमदारांचे निलंबन मागे घेण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे.