मूगगावच्या कावळ्यांचा मृत्यू बर्ड फ्ल्यूने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:28 IST2021-01-13T05:28:43+5:302021-01-13T05:28:43+5:30
११बीईडीपी-२८ कोंबड्यांचे स्वॅब घेताना. ११बीईडीपी-२९ मृत कावळे अनिल गायकवाड कुसळंब (जि.बीड) : गेल्या तीन-चार दिवसांपासून बीड जिल्ह्याच्या पाटोदा तालुक्यातील ...

मूगगावच्या कावळ्यांचा मृत्यू बर्ड फ्ल्यूने
११बीईडीपी-२८ कोंबड्यांचे स्वॅब घेताना. ११बीईडीपी-२९ मृत कावळे
अनिल गायकवाड
कुसळंब (जि.बीड) : गेल्या तीन-चार दिवसांपासून बीड जिल्ह्याच्या पाटोदा तालुक्यातील आठेगाव पुट्यातील मूगगाव येथे अचानक मृत कावळे दिसू लागल्याने ग्रामस्थांत प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या संदर्भातील बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर संबंधित खात्याच्या डॉक्टरांनी भेटी देऊन संबंधित कावळ्यांना पुणे येथे पाठविले; तेथून ते भोपाळला जाऊन सोमवारी हा अहवाल आला आहे. त्यानुसार मूगगाव येथील कावळ्यांचा मृत्यू बर्ड फ्लूने झाल्याचा अहवाल येताच जिल्हाभरात खळबळ माजली आहे.
दरम्यान, बीड जिल्हा प्रशासन गतिमान झाले असून पशुसंवर्धन विभागाला सतर्कतेचे आदेश देण्यात आल्याने संबंधित अधिकारी मूगगावात दाखल झाले. सोमवारी पाटोदा तालुका पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. राख, डॉ.उगलमुगले आदीसह त्यांच्या सहकाऱ्यांची टीम गावात दाखल झाली. त्यांनी येथील पंचवीस कोंबड्यांचे घशातले स्वँब घेतले असून पुढील तपासणीसाठी भोपाळ येथे तत्काळ पाठविण्याची कार्यवाही केली आहे. कावळ्यांच्या आलेल्या अहवालात एकूण दहा वायरसपैकी ‘एच -फाईव्ह, एच-वन,’ हे व्हायरस या मृत कावळ्यांमध्ये आढळले असल्याची सूत्रांची माहिती आहे. या व्हायरसपासून मनुष्याला संसर्ग होत नाही; मोठा धोका काही नाही; परंतु काळजी घ्यायला हवी. हा संसर्ग पक्षापक्षात होतो, मनुष्यात नाही. कुठे पक्षी मेल्याचे आढळून आल्यास चुना टाकून खड्ड्यात पुरावे आणि फवारणी करावी, तसेच फवारणी करून एरिया सील करावा,असे आवाहन अधिकाऱ्यांच्या वतीने करण्यात आले आहे. दरम्यान, या कावळ्यांच्या संदर्भामध्ये प्रशासनातील संबंधित विभागाने योग्य दखल घेऊन उपचार न केल्याची भावना वंचितच्या वतीने व्यक्त करण्यात आली असून यासंबंधी वंचितचे सचिन मेगडंबर आणि दीपक थोरात यांनी तहसीलदारांना निवेदन दिले आहे.
‘एच फाईव्ह,एच वन’ व्हायरस आढळला
एच फाईव्ह एच वन या व्हायरसचा संसर्ग पक्षामध्ये होतो. मनुष्यामध्ये नाही. तरीही या संबंधितांनी काळजी घेत मृत पक्षी आढळल्यास तो चुना टाकून पुरवून फवारणी करावी आणि एरिया सील करावा.
मूगगाव येथे येऊन २५ कोंबड्यांच्या घशातले स्वॅब घेतले व पुढील तपासणीसाठी भोपाळच्या प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत; हा अहवाल येईपर्यंत कोणीही या कोंबड्या विकू नयेत आणि ग्रामपंचायतने यासंबंधी सूचना द्याव्यात.
डॉ. राख,बळीराम
( तालुका पशुवैद्यकीय अधिकारी, पाटोदा)
शासनाच्या सूचनांचे ग्रामपंचायतकडून पालन
कावळ्यांचा बर्ड फ्लू चा अहवाल आल्यानंतर प्रशासनाच्या वतीने अधिकारी गावात आले. त्यांनी यासंदर्भात सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत
संजय खोटे
( सरपंच, मूगगाव ता.पाटोदा)