Beed Walmik Karad: बीडमधील पवनचक्की कंपनीला मागितलेली खंडणी आणि मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी अटकेत असलेल्या वाल्मीक कराडसह विष्णू चाटे, सुदर्शन घुले आणि अन्य आरोपींच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. कारण या आरोपींचे एक महत्त्वाचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले आहे. पवनचक्की कंपनीला ज्या दिवशी खंडणी मागण्यात आली त्याच दिवशी वाल्मीक कराड आणि सुदर्शन घुले हे केजमधील विष्णू चाटे याच्या कार्यालयात एकत्र प्रवेश करत असल्याचं सीसीटीव्ही फुटेजमधून स्पष्ट झालं आहे.
२९ नोव्हेंबर २०२४ रोजी वाल्मीक कराड याने विष्णू चाटेच्या मोबाईलवरून अवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांना धमकी देऊन खंडणी मागितल्याची तक्रार आहे. या तक्रारीच्या अनुषंगाने सबळ पुरावा आता पोलिसांच्या हाती लागला आहे. वाल्मीक कराड, सुदर्शन घुले, विष्णू चाटे आणि इतर काहीजण २९ नोव्हेंबर रोजीच एकत्रितपणे केज येथील विष्णू चाटेच्या कार्यालयात गेले होते. सीसीटीव्ही फुटेजमधून ही बाब आता उघड झाली आहे.
दरम्यान, याआधी वाल्मीक कराडने पवनचक्की कंपनीच्या अधिकाऱ्यासोबत फोनवरून केलेलं संभाषणही पोलिसांच्या हाती लागले आहे. त्यामुळे खंडणी आणि खून प्रकरणात वाल्मीक कराड याच्यासह विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले यांचाच हात आहे, या दाव्याला आणखी बळ मिळाले आहे.
वाल्मीकच्या जामिनावरील सुनावणी ढकलली पुढे
केज तालुक्यातील मस्साजोग शिवारात उभारण्यात आलेल्या आवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांना दोन कोटींची खंडणी मागून त्यांना जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी केज न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावलेल्या व मकोकातील आरोपी वाल्मीक कराड याच्या जामीन अर्जावरील सुनावणी पुन्हा पुढे ढकलण्यात आली आहे. आता ही सुनावणी गुरुवारी केज न्यायालयात होणार आहे.
मकर संक्रांतीच्या दिवशी वाल्मीक कराड याला खंडणीच्या गुन्ह्यात केज न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली होती. त्याचवेळी त्याचे वकील ॲड. सिद्धेश्वर ठोंबरे यांनी न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता. १६ जानेवारी रोजी सरकारी वकील ॲड. जितेंद्र शिंदे यांनी म्हणणे मांडणारा से केज न्यायालयात दाखल करताच या प्रकरणाची सुनावणी शनिवारी १८ जानेवारी होईल, असे न्यायालयाने सांगितले होते.