Beed Sarpanch Murder Case: मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या तीन आरोपींना कोर्टाने १४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. सरपंच देशमुख यांची हत्या करून सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे हे आरोपी फरार झाले होते. तर आरोपींना संतोष देशमुख यांच्याविषयी माहिती देणारा सिद्धार्थ सोनवणे हादेखील फरार होता. या तीनही आरोपींना स्थानिक गु्न्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी रात्री उशिरा अटक केली. आरोपींना आज कोर्टात हजर केल्यानंतर दोन्ही बाजूच्या वकिलांचा युक्तिवाद झाला आणि त्यानंतर कोर्टाने तीनही आरोपींना १४ दिवसांची सीआयडी कोठडी सुनावली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सरकारी वकिलांनी आज बाजू मांडताना म्हटलं की, या आरोपींकडून दहशत माजवून खंडणी मागितली जात असल्याने या भागात नवीन उद्योग येत नाहीत. तसंच संघटितपणे आरोपींकडून गुन्हेगारी सुरू आहे. या प्रकरणाचा सखोल तपास करण्यासाठी आरोपींना पोलीस कोठडी देण्यात यावी, अशी विनंती सरकारी वकिलांकडून करण्यात आली. ही विनंती मान्य करत कोर्टाने आरोपींना १४ दिवसांची कोठडी सुनावली आहे.
आरोपींना पुण्यातून अटक, एक जण अजूनही फरार
संतोष देशमुख हत्या प्रकरणात यापूर्वी चार आरोपींना अटक करण्यात आली होती. आरोपी विष्णू चाटे, जयराम चाटे, प्रतीक घुले आणि महेश केदार यांचा समावेश होता. तर आरोपी सुदर्शन चंद्रभान घुले , कृष्णा शामराव आंधळे, सुधीर ज्ञानोबा सांगळे हे फरार होते. या आरोपींना पकडण्यासाठी प्रसिद्धीपत्रक जारी करत फरार घोषित करण्यात आलं होतं. त्यानंतर आता सुदर्शन घुले, सुधीर सांगळे यांना अटक करण्यात आली आहे. तर कृष्णा आंधळे अद्याप फरार आहे. दोन्ही आरोपींना पुण्यातून अटक करण्यात आली आहे. बालेवाडी येथील श्री शिव छत्रपती क्रीडा संकुल परिसरातील एका खोलीतून घुले आणि सांगळे यांना ताब्यात घेतले. मात्र आंधळे तेथून पसार झाल्याची माहिती मिळाली. देशमुख यांच्या हत्या प्रकरणात प्रत्यक्ष सहभागी असलेल्या तिघांना पोलिसांनी यापूर्वीच अटक केली. मात्र, सुदर्शन घुले, सुधीर सांगळे आणि संतोष आंधळे हे तीन आरोपी फरारी होते. त्यांना पसार होण्यास मदत केल्याप्रकरणी डॉ. संभाजी वायबसे आणि सिद्धार्थ सोनवणे यांना पोलिसांनी शुक्रवारी (दि. ३) अटक केली. त्यानंतर पसार आरोपी पुण्यातील बालेवाडी परिसरात असल्याची माहिती तपासात मिळाली. त्यानंतर पोलिसांचे पथक पुण्यात दाखल झाले. बालेवाडी येथील श्री शिव छत्रपती क्रीडा संकुल परिसरातील एका खोलीतून घुले आणि सांगळे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.