बीड : महादेव मुंडे खून प्रकरणाच्या तपासासाठी स्थापन करण्यात आलेल्या विशेष तपास पथकाकडून (एसआयटी) मोठे पाऊल उचलण्यात आले आहे. या प्रकरणातील महत्त्वपूर्ण माहिती देणाऱ्या नागरिकाला रोख बक्षीस देण्यात येणार असून, त्याचे नाव गोपनीय ठेवले जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. एसआयटीचे प्रमुख आयपीएस पंकज कुमावत यांनी बुधवारी सकाळी ही माहिती दिली.
खून प्रकरणाचा छडा लावण्यासाठी एसआयटीकडून वेगाने तपास सुरू आहे. मात्र, काही ठोस पुरावे व माहिती अद्यापही मिळालेली नाही. त्यामुळे जनतेच्या मदतीसाठी आवाहन करताना एसआयटीने एक अधिकृत पत्रक जारी केले आहे. या पत्रकात म्हटले आहे की, “या प्रकरणातील कुणालाही ठोस माहिती असल्यास त्यांनी ती तपास पथकाला तात्काळ द्यावी. माहिती देणाऱ्याचे नाव पूर्णतः गोपनीय ठेवले जाईल आणि त्यांना बक्षीस देण्यात येईल.”
या खुनामुळे संपूर्ण परळी सह जिल्ह्यात खळबळ उडाली असून, गुन्हेगार लवकरात लवकर गजाआड जावा, अशी अपेक्षा सर्वत्र व्यक्त होत आहे. एसआयटीकडून या प्रकरणाचा तपास गतीने सुरू आहे.