बीड : मस्साजोग सरपंच हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुलेसह नऊ जणांवर मकोका लावला आहे. यात सीआयडीने सुदर्शन घुले याला गँगचा लिडर दाखविले आहे तर वाल्मीक कराडला सदस्य केले आहे. तसेच याच गुन्ह्यात आरोपी वाढण्याची शक्यता आहे. तर दुसऱ्या बाजूला मकोका लागताच सीआयडीचे तपास अधिकारीदेखील बदलण्यात आले आहेत.
केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची ९ डिसेंबर रोजी अपहरण करून हत्या झाली होती. यात सुदर्शन घुले, विष्णू चाटेसह आठ जण अगोदर आरोपी होते. त्या सर्वांवर मकोका लावला होता. परंतु, खंडणीच्या गुन्ह्यातील आरोपी वाल्मीक कराड याचादेखील यात सहभाग असल्याचा आरोप करीत देशमुख कुटुंबाने आंदोलन केले होते. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी कट रचल्याचा ठपका ठेवत कराडवरदेखील मकोका लावला. आता एकूण नऊ आरोपींवर मकोका लागला असून, कृष्णा आंधळे अद्यापही फरार आहे. मकोका लावताना सीआयडीने सुदर्शन घुले याला गँगचा प्रमुख केले आहे. कराड हा सदस्य आहे. आता यात आणखी कोणाचा सहभाग आहे का? याचा शोध सीआयडी घेत आहे.
मकोका लागताच आयओ बदललेहत्या प्रकरणाचा तपास आतापर्यंत उपअधीक्षक अनिल गुजर करीत होते. परंतु, आता आरोपींना मकोका लागला. त्यानंतर वाल्मीक कराड याचाही सहभाग आढळला. त्यामुळे गुजर यांच्याकडून तपास काढून घेत छत्रपती संभाजीनगरच्या अपर पोलिस अधीक्षक किरण पाटील यांच्याकडे तपास देण्यात आला आहे. यासह ६ डिसेंबरच्या मारहाण व ॲट्रॉसिटीचा तपासही पाटील यांच्याकडे दिला आहे. खंडणीचा तपास गुजर यांच्याकडे कायम असल्याचे सूत्रांनी सांगितले.
धनंजय देशमुखचा आज जबाब घेणारहत्या प्रकरणात न्यायालयात १६४ प्रमाणे संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय व पत्नी अश्विनी देशमुख यांचा जबाब घेतला जाणार आहे. त्यातील धनंजय यांचा शुक्रवारी जबाब घेतला जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यानंतर त्यांच्या पत्नीचा जबाब होणार आहे.
कराड-चाटे यांचा हत्येच्या दिवशी कॉलसीआयडीने कराड, चाटे, घुले यांच्यासह इतर आरोपींचे कॉल डिटेल्स काढले आहेत. यात संतोष देशमुख यांच्या हत्येच्या दिवशी कराड आणि चाटे यांच्यात कॉल झाले आहेत. तसेच चाटे आणि घुले यांच्यातही संवाद झाला. हाच धागा पकडून कराडला मकोकामध्ये घेतल्याचे सूत्रांनी सांगितले. अजूनही सीडीआरवर काम चालू आहे. याची माहिती अत्यंत गोपनीय ठेवली जात आहे.
कराडच्या आवाजाचा नमुना पाठवलाआवादा कंपनीच्या अधिकाऱ्याला दोन कोटी रुपयांची खंडणी मागितल्याच्या फिर्यादीत विष्णू चाटे याच्या मोबाइलवरून वाल्मीक कराड बोलल्याचा उल्लेख होता. हीच रेकॉर्डिंग सीआयडीच्या हाती लागली होती. याची खात्री करण्यासाठीच या दोघांच्याही आवाजाचे नमुने घेतले होते. ते आता छत्रपती संभाजीनगरच्या प्रयोगशाळेत तपासणीला पाठविले आहेत. त्याचा अहवाल येण्याची प्रतीक्षा सीआयडीला आहे.
आठ आरोपी, चार कोठडीत?आतापर्यंत आठ आरोपी बीड पोलिसांनी पकडून सीआयडीच्या ताब्यात दिले आहेत. त्यातील वाल्मीक कराड हा बीड शहर पाेलिस ठाण्यात, विष्णू चाटे लातूरच्या कारागृहात, सुदर्शन घुले, सुधीर सांगळे आणि सिद्धार्थ साेनवणे माजलगाव शहर ठाण्यात तर प्रतीक घुले, महेश केदार आणि जयराम चाटे हे गेवराई पोलिस ठाण्यातील कोठडीत आहेत.