बीड : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची वाढती संख्या पाहता कडक उपाययोजना केल्या जात आहेत. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी मंगळवारी सर्व गटविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेतली. यात कंटेनमेंट झोनवर नजर ठेवण्यासाठी भरारी पथकांची निवड केली जाणार आहे, तसेच तालुकानिहाय संपर्क अधिकारी नियुक्त करण्याच्या सूचना केल्या. चाचण्या वाढविण्यासही सांगितले.
जिल्ह्यातील वाढती रुग्णसंख्या आता डोकेदुखी ठरत आहे. ती आटोक्यात आणण्यासाठी उपाययोजना केल्या जात असल्या तरी लोक नियमांचे पालन करत नसल्याचे दिसत आहे. हाच धागा पकडून अजित कुंभार यांनी मंगळवारी बीडीओ व टीएचओंची बैठक घेतली. बीडीओंना जास्त रुग्णसंख्या असलेली गावे कंटेनमेंट झोन करण्याच्या सूचना दिल्या, तसेच ग्रामसेवकांमार्फत नजर ठेवण्यास सांगितले. प्रत्येक पंचायत समिती अंतर्गत याची पाहणी करण्यासाठी भरारी पथके तयार करून एका संपर्क अधिकाऱ्याची नियुक्ती करण्याची सूचना केली. यावेळी टीएचओंना चाचण्या वाढविण्याच्या सूचना केल्या. कॅम्प घेऊन जास्तीत जास्त आरटीपीसीआर चाचण्या वाढवा, बाधिताना शोधून लवकर रुग्णालयात अथवा कोविड सेंटरमध्ये दाखल करण्याच्या सूचनाही कुुंभार यांनी आरोग्य विभागाला दिल्या. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, प्र.जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रौफ शेख आदींची उपस्थिती होती.
---
नागरिकांनो चाचणी करण्यासाठी पुढे या
एखादा रुग्ण आढळल्यास त्याच्या संपर्कातील लोकांनी चाचणी करून घेणे गरजेचे आहे. आरोग्य विभागाने आवाहन करूनही लोक पुढे येत नसल्याचे दिसत आहे, त्यामुळे चाचण्या कमी होत आहेत. चाचणी करून घेतल्यास लवकर संसर्ग निष्पन्न होऊन उपचार करणे सोपे होईल, त्यामुळे न घाबरता कोरोना चाचणी करून घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.
100821\10_2_bed_31_10082021_14.jpeg~100821\10_2_bed_30_10082021_14.jpg
मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी जिल्ह्यातीलच सर्वच बीडीओ, टीएचओंची बैठक घेतली.~संदीप चव्हाण