फेसबुकवर अनोळखी सुंदरीने चॅटिंग केल्यास सावधान, हनी ट्रॅप वाढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:23 IST2021-06-18T04:23:48+5:302021-06-18T04:23:48+5:30
बीड : फेसबुकवर हनी ट्रॅपचे प्रकार मागील काही दिवसांपासून वाढले आहेत. अनोळखी सुंदरीच्या मोहमायेत फसून अनेक जणांना लाखो रुपयांना ...

फेसबुकवर अनोळखी सुंदरीने चॅटिंग केल्यास सावधान, हनी ट्रॅप वाढले
बीड : फेसबुकवर हनी ट्रॅपचे प्रकार मागील काही दिवसांपासून वाढले आहेत. अनोळखी सुंदरीच्या मोहमायेत फसून अनेक जणांना लाखो रुपयांना गंडा घातल्याचे प्रकार घडले आहेत. त्यामुळे अनोळखी सुंदरीच्या मोहजालात फसू नका, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
फेसबुकच्या माध्यमातून मैत्री वाढवून प्रेमाच्या जाळ्यात ओढण्याचे प्रमाण वाढले आहे. तसेच काही दिवसांनंतर आर्थिक लुबाडणूक केल्याचे प्रकारदेखील समोर आलेले आहेत. काही ठिकाणी तर, व्हीडिओ कॉल करून नग्न होत तो रेकॉर्ड केला जातो. त्यामाध्यमातून बदनामी करण्याची धमकी देत लाखो रुपयांची मागणीदेखील केली जाते. मात्र, अनेकजण बदनामीपोटी पैसे देण्यास तयार होतात व तक्रारदेखील करत नाहीत. मात्र, असे प्रकार कोणासोबत घडले तर, त्यांनी थेट पोलीस प्रशासनाशी संपर्क करणे गरजेचे आहे.. त्यामुळे योग्य ती कारवाई करण्यास पोलिसांना यश येते व पुन्हा अनेकांची होणारी फसवणूक टाळता येते. त्यामुळे असे प्रकार घडल्यास तत्काळ पोलिसांत तक्रार करा, असे आवाहन देखील सायबर पोलिसांकडून करण्यात आले आहे.
ही घ्या उदाहरणे
लाखो रुपयांना गंडा
एका युवकाला फेसबुकवर सुंदर मुलीची फ्रेंड रिक्वेस्ट आली. त्याने आनंदाने ती स्वीकारली. त्यांच्यात संवाद सुरू झाला. त्याचे रुपांतर प्रेमात झाले. तरुणीने अश्लिल व्हीडिओ तयार करून लाखो रुपयांना फसविले.
महिलेने फसविले
फेसबुकवर सुंदर महिलेला एका व्यक्तीने फ्रेंड रिक्वेस्ट पाठविली. तिने ती रिक्वेस्ट स्वीकारली. त्यानंतर बोलणे सुरू झाले. अश्लिल फोटो शेअर करण्यात आले. त्यानंतर महिलेने हे व्हायरल करण्याची धमकी देत लाखो रुपयांना लुटले.
प्रेमाचा बनाव करीत झाली पैशाची मागणी
सोशल मीडियात प्रारंभी ओळख झाली. त्यातून मैत्री व त्याचे रूपांतर प्रेमात झाले. दरम्यान, विविध अडचणी असल्याचे सांगत वेळोवेळी त्याच्याकडून तिने लाखो रुपये उकळले. त्यानंतर लक्षात आले की हे सोशल मीडियावरील अकाऊंट फेक होते.
असे ओढले जाते जाळ्यात
फेसबुकवरून अनोळखी सुंदरीकडून संपर्क साधला जातो. समोरची व्यक्ती कुठलीही खातरजमा न करता थेट संपर्क करतो. त्यानंतर चॅटिंग सुरू होते. व्हिडिओ कॉलिंग सुरू होते. त्याचा गैरफायदा घेत दोघेही अश्लिल चाळे त्यामध्ये करतात. मात्र, त्याला माहीत नसते तो कॉल रेकॉर्ड होत आहे. त्यानंतर पैशाची मागणी करून फसवणूक केली जाते.
शंका आल्यास तातडीने संपर्क साधा
फेसबुकबरोबर इतर सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली फसवणूक होते. कोणीतरी ब्लॅकमेलिंग करीत आहे असा संशय आल्यावर संबंधित पोलीस ठाण्याशी संपर्क करून मदत मागता येते.
संशय आल्यानंतर संवाद व इतर व्यवहार करू नये. सावधानता बाळगत त्यामधून बाहेर कसे पडता येईल असा प्रयत्न करावा.
युवकांनी सतर्क असण्याची गरज
सध्या सोशल मीडियातून सायबर क्राईमचा टक्का वाढला आहे. गुन्हेगारांकडून वेगवेगळ्या माध्यमातून नागरिकांना फसविण्याचे प्रकार समोर येत आहेत. हनी ट्रॅपमधून गंडविले जात आहे. अत्यंत हुशारीने या टोळ्या समोरच्या व्यक्तीला फसवत आहेत. त्यामुळे सतर्क राहणे गरजेचे आहे. मात्र, अशी फसवणूक होत असेल तर पोलिसांकडे तक्रार करावी.
आर. एस. गायकवाड, सायबर सेल प्रमुख, बीड