लाभार्थी आले, बसले अन् लस नसल्याने निघून गेले...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:33 IST2021-04-11T04:33:34+5:302021-04-11T04:33:34+5:30
बीड : जिल्ह्यातच नव्हे, तर राज्यात सध्या कोरोना लसीचा तुटवडा जाणवत आहे. शनिवारी तर लसच उपलब्ध नसल्याने लाभार्थ्यांना तासन्तास ...

लाभार्थी आले, बसले अन् लस नसल्याने निघून गेले...
बीड : जिल्ह्यातच नव्हे, तर राज्यात सध्या कोरोना लसीचा तुटवडा जाणवत आहे. शनिवारी तर लसच उपलब्ध नसल्याने लाभार्थ्यांना तासन्तास बसून रिकाम्या हाताने परतावे लागले. जास्त त्रास हा ज्येष्ठांना सहन करावा लागला. आता आरोग्य विभागाला ६ हजार डोस आणखी मिळणार असल्याचे सांगण्यात आले.
जिल्ह्यात १६ जानेवारीपासून कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली. सुरुवातीला अल्प प्रतिसाद मिळाला; परंतु मनातील गैरसमज दूर झाल्यानंतर नागरिकांनी लस घेण्यासाठी गर्दी केली. त्यामुळे लसीचा तुटवडा जाणवू लागला आहे. मागील आठवड्यापासून तर केंद्रावर रांगा लागत आहेत. शुक्रवारी थोड्याफार प्रमाणात लस मिळाली; परंतु शनिवारी बहुतांश केंद्रांवर लसच उपलब्ध नव्हती. जिल्हा रुग्णालयातही केवळ कोव्हॅक्सिन लस देण्यात आली. कोविशिल्ड लसीचा तुटवडा कायम होता. कोव्हॅक्सिन ही लस केवळ दुसरा डोस असणाऱ्यांना देण्यात येत होती.
दरम्यान, लसीच्या तुटवड्याबद्दल माहिती नसल्याने ज्येष्ठांनी सकाळपासूनच केंद्रावर गर्दी केली होती. लस येईल या अपेक्षेने ते तासन्तास बसले होते; परंतु लस न मिळाल्याने त्यांना रिकाम्या हाताने परतावे लागले. दिवसभर लाभार्थ्यांना त्रास सहन करावा लागला. लस उपलब्ध करण्याची मागणी सामान्यांमधून होत आहे.
आज येणार सहा हजार डोस
राज्यातील ज्या जिल्ह्यात लस शिल्लक आहे, ती इतरांना देण्यात येत आहे. त्याप्रमाणे रविवारी जिल्ह्यात कोविशिल्डचे ६ हजार डोस येणार आहेत. ते आणण्यासाठी पुण्याला गाडी गेली असल्याचे सांगण्यात आले, तसेच १५ एप्रिल रोजी राज्याला जवळपास ७ लाख डोस मिळणार आहेत. त्यापैकी जिल्ह्याला किती मिळतात, याची प्रतीक्षा आहे.
शनिवारी लस संपली होती. कोविशिल्डचे आणखी सहा हजार डोस येणार आहेत. सध्या लसीचा तुटवडा जाणवत आहे. १५ एप्रिलला आणखी डोस मिळतील, अशी अपेक्षा आहे. आमच्याकडून पाठपुरावा सुरूच आहे.
-डॉ. संजय कदम, नोडल ऑफिसर, बीड