बीड : शिक्षणासाठी बाहेर ठेवलेला मुलगा दहावीला असताना रागाच्या भरात २०१७ साली निघून गेला. त्यानंतर २०२३ मध्ये अपहरणाचा गुन्हा दाखल झाला. परंतु, पोलिसांना सापडत नव्हता. दोन दिवसांपूर्वी तो पुण्यात असल्याचे समजताच पोलिसांनी शोध घेत त्याला बीडला आणले. त्यानंतर आई-वडिलांना शुक्रवारी तपासात मदत हवीय म्हणून बोलावून घेतले. पोलिस अधीक्षकांसमोर चर्चा सुरू असतानाच मुलाला समोर आणत ‘सरप्राईज गिफ्ट’ दिले. यावेळी मुलासह सर्वच नातेवाइकांना अश्रू अनावर झाले.
शिक्षणाचा कंटाळा, त्यात घरच्यांचा तगादा...राजू काकासाहेब माळी (वय २४, रा. खळवट लिमगाव, ता. वडवणी) असे या मुलाचे नाव आहे. त्याचे आई-वडील ऊसतोड मजूर आहेत.
त्याला शिक्षणासाठी नाळवंडी (ता. बीड) येथे ठेवले होते. २०१७ साली तो शिक्षणाचा कंटाळा आणि रागाच्या भरात निघून गेला. नातेवाइकांनी सहा वर्षे शोध घेतला, पण तो मिळून आला नाही. त्यामुळे पिंपळेनर पोलिस ठाण्यात २०२३ रोजी गुन्हा दाखल झाला होता. तो पुण्यात असल्याचे समजताच गुन्हे शाखेचे पथकाने शोधून आणले.
मुलाची पालकांसोबत ‘फिल्मी स्टाईल’ भेटराजूच्या आई-वडिलांसह आजोबांनाही तपासात मदत हवी म्हणून बीडला बोलावले. पोलिस अधीक्षक नवनीत काँवत, अपर अधीक्षक सचिन पांडकर यांच्यासमोर ते चर्चा करत होते. अचानक उपनिरीक्षक श्रीराम खटावकर हे राजूला घेऊन आले. जेव्हा ओळख पटली तेव्हा राजू आईला मिठी मारत रडू लागला. अधिकाऱ्यांचे डोळे पाणावले.
२०१७ साली राजूने पुणे गाठले. सुरक्षा रक्षकाची नोकरी केली. त्यानंतर वेल्डिंगचे काम शिकून गुजरातला गेला. आठवड्यापूर्वी पुन्हा पुण्यात आला.