बीड : उमाकिरण शैक्षणिक संकुलात शिक्षण घेणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या विजय पवार आणि प्रशांत खाटोकर यांना शनिवारी मध्यरात्री बेड्या ठोकण्यात आल्या. ते दोघेही वेगवेगळ्या वाहनांतून पुणे, मुंबईला फिरले. बीड जिल्ह्यात येऊन भेटणार असतानाच, पोलिसांनी त्यांना अटक केली. त्यांना १ जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
शहरातील उमाकिरण शैक्षणिक संकुलात अकरावीच्या वर्गात पीडिता शिक्षण घेत होती. ३० जुलै २०२४ ते २५ मे २०२५ या काळात विजय पवार आणि प्रशांत खाटोकर या दोन शिक्षकांनी या विद्यार्थिनीला आपल्या केबीनमध्ये बाेलावून घेत बॅड टच केला. तिला कपडे काढायला लावून नग्न फोटो काढले. याप्रकरणी २६ जून रोजी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. तेव्हापासून हे दोघे फरार होते. त्यांच्या मागावर तीन पाेलिस पथके होती. अखेर शनिवारी मध्यरात्री पवार याला बीड तालुक्यातील लिंबागणेश तर खाटोकरला चौसाळा येथून अटक करण्यात आली. त्यांना पिंक पथकाच्या स्वाधीन केले आहे.
खाटोकरचा मावस भाऊही पकडलाप्रशांत खाटोकर हा बीडवरून भूमला आपला मावस भाऊ अजय बोत्रे याच्याकडे गेला. तेथून दोघेही पुण्याला गेले. पाेलिस मागावर असल्याचे समजल्याने अजय हा पुण्यात थांबला तर प्रशांत मुंबईला गेला. अजयला शुक्रवारीच ताब्यात घेतले होते. त्यालाही आरोपीला मदत केल्याप्रकरणी ताब्यात घेतल्याचे समजते. परंतु पोलिसांनी याची माहिती दिली नाही.
पवार, खाटोकरच्या भेटीचा प्लॅनविजय पवार आणि खाटोकर हे दोघेही शनिवारी मध्यरात्री भेटून चर्चा करणार होते. त्यानंतर ते पाेलिसांना शरण येणार होते. पवार हा पुण्यावरून आपल्या जीपमधून मांजरसुंबा तर प्रशांत हा मुंबईवरून खासगी कारने येत होता. दोघांची भेट होण्याआधीच स्थानिक गुन्हे शाखेने त्यांना बेड्या ठोकल्या.
१ जुलैपर्यंत पोलिस कोठडीया दोन्ही आरोपींना रविवारी दुपारी न्यायालयात हजर केले. मोबाइल जप्त करण्यासह इतर मुद्द्यांवर त्यांना १ जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.
पवारच्या चेहऱ्यावर तणाव तर खाटोकरच्या नैराश्यदोन्ही आरोपींना बीड शहर पोलिस ठाण्याच्या कोठडीतून बाहेर काढत न्यायालयात नेले जात होते. बाहेर काढल्यानंतर विजय पवार याच्या चेहऱ्यावर तणाव होता तर खाटोकरचा चेहऱ्यावर नैराश्य स्पष्ट जाणवत होते. कोठडीतून काढताना दोघांनाही हातकड्या लावल्या नव्हत्या.
दोन्ही आरोपींना अटक केली असून, त्यांना शिवाजीनगर पाेलिसांच्या स्वाधीन केले. पुढील तपास पिंक पथक करेल.- शिवाजी बंटेवाड, पोलिस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा