परभणी केसापुरी येथील जिल्हा परिषद शाळेतील एका विद्यार्थिनीने राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीडचे पालकमंत्री अजित पवार यांना पत्र लिहून आपली व्यथा मांडली. "दादा, कागदावर शाळा चकाचक दिसते, पण प्रत्यक्षात पिण्यासाठी पाणीही नाही. भ्रष्टाचारामुळे आमचं भविष्य टांगणीला लागलंय. आम्ही काय आयुष्यभर ऊसतोड मजूरच बनायचं का? आम्हालाही अधिकारी व्हायचंय!", असे पत्रात नमूद केले आहे.
पत्रात नमूद केल्यानुसार, परभणी केसापुरी (ता. माजलगाव) येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षकांची शिकवण्याची जिद्द मोठी आहे, मात्र तिथे भौतिक सुविधांचा पूर्णत: अभाव आहे. शाळेसाठी लाखो रुपयांचा निधी मंजूर झाला असून कागदोपत्री सर्व व्यवस्था पूर्ण झाल्याचे दाखवले जात आहे. मात्र, प्रत्यक्षात विद्यार्थ्यांना स्वच्छ प्यायला पाणी नाही, शौचालयांची दुरावस्था झाली आहे. खेळाच्या साहित्याची कमतरता आहे.
शाळेच्या नावाखाली आलेला निधी नेमका कुठे गेला? असा प्रश्न या चिमुरडीने उपस्थित केला आहे. "सरपंच बाईंचे पती सर्व कारभार पाहतात, कागदावर सगळे ठीक दाखवून पैसे काढले जातात, पण आम्हाला काहीच मिळत नाही," असा आरोप या पत्राद्वारे करण्यात आला आहे. आता पालकमंत्री अजित पवार या पत्राची दखल घेऊन शाळेचा कायापालट करणार का, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
पत्रात काय लिहिले?
"नमस्कार दादा आणि माझे काका, मी बीड जिल्ह्यातील परभणी केसापुरी गावातल्या जिल्हा परिषद शाळेत शिकणारी एक साधी मुलगी आहे. आज पहिल्यांदाच इतक्या मोठ्या व्यक्तीला पत्र लिहित आहे. हात थरथरत आहेत, पण मनातले दुख कोणाला तरी सांगायला हवे म्हणून हे पत्र लिहीत आहे. दादा आमची ही शाळा नावापुरती नसून आमच्यासाठी ज्ञानमंदिर आहे. शाळेतील सर्व शिक्षक वृंद आमच्यासाठी शिकवताना आमच्या भविष्यासाठी ज्ञानार्जनाची शिदोरी आमच्या कायम पाठीशी उभे राहतील, इतके ज्ञानी, सज्जन आणि विद्यार्थी प्रिय शिक्षक वृंद आम्हाला लाभले आहेत. पण इथे शिकण्यासाठी कुठलीच सोय नाही, पिण्यासाठी स्वच्छ पाणी, नाही हात धुण्यासाठी हँडवॉश नाही, खेळण्यासाठी साधे साहित्यही नाही, तरीही आम्ही शाळेत येतो. कारण आम्हाला शिकायचे आहे", असे पत्रात नमूद करण्यात आले.
पुढे पत्रात असेही लिहिण्यात आले आहे की, "दादा फक्त कागदावर सर्व काही ठीक असल्याचे दाखवले जाते. आमच्या शाळेत विद्यार्थ्यांसाठी सर्व व्यवस्था करण्यात आली आहे, असे सांगून लाखो रुपये काढले गेले आहेत, असे आम्हाला कळते आहे. सरपंच बाईंचे पती हे सगळे पाहतात म्हणे, पण आम्हाला मात्र काहीच मिळालेले नाही. आम्ही रोज रिकाम्या डोळ्यांनी शाळेकडे पाहतो. दादा आम्ही काय आयुष्यभर ऊसतोड मजूरच बनायचे का? आणि स्वप्न नाहीत का? आम्हालाही डॉक्टर, शिक्षक, अधिकारी व्हायचे आहे. पण शाळेतच सोय नसेल तर आम्ही कसे पुढे जाणार? काका तुम्ही आमचे पालकमंत्री आहात, हा तुमचा जिल्हा आहे, आम्ही फार काही मागत नाही, फक्त शिकण्यासाठी लागणाऱ्या मूलभूत सुविधा, स्वच्छ पाणी, स्वच्छ शौचालय, खेळाचे साहित्य आणि आमच्यासाठी प्रामाणिकपणे काम करणारी व्यवस्था द्या. दादा हे माझे पत्र वाचताना कदाचित तुम्हाला मी फार लहान वाटेल. पण आमचे दुख मोठे आहे. एकदा तरी आमच्या शाळेकडे लक्ष द्या. तुमच्या एका निर्णयाने आमचे आयुष्य बदलू शकते."
Web Summary : A student's letter to Ajit Pawar highlights Parbhani school's lack of facilities despite allocated funds. She questions if they are destined for sugarcane cutting, urging Pawar to provide basic amenities for education and change their fate.
Web Summary : एक छात्रा का अजित पवार को पत्र परभणी स्कूल में आवंटित धन के बावजूद सुविधाओं की कमी को उजागर करता है। वह सवाल करती है कि क्या वे गन्ना काटने के लिए अभिशप्त हैं, पवार से शिक्षा के लिए बुनियादी सुविधाएं प्रदान करने और उनका भाग्य बदलने का आग्रह करती हैं।