बीड : तीन वेगवेगळ्या घटनांमध्ये नागरिकांनी पोलिसांकडे खोट्या तक्रारी दाखल करून यंत्रणेची दिशाभूल केल्याचे उघड झाले आहे. या तक्रारी सुरुवातीला गंभीर वाटल्या असल्या तरी, पोलिसांनी केलेल्या सखोल तपासानंतर त्या पूर्णतः बनावट असल्याचे सिद्ध झाले आहे. त्यामुळे खोट्या तक्रारी करणाऱ्या संबंधित व्यक्तींविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम २१७ अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
या घटनांमुळे संबंधित व्यक्तींनी पोलीस यंत्रणेचा गैरवापर करून तिची दिशाभूल केली आहे. समाजात खोट्या तक्रारींच्या माध्यमातून भीती निर्माण करण्याचा प्रयत्न झाला आहे. अशा कृत्यांमुळे खऱ्या तक्रारींची चौकशी करण्यासही विलंब होतो, ज्यामुळे सामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. पोलिसांनी मात्र सर्व खात्री, चौकशी करून खोटी तक्रार देणाऱ्यांवरच कारवाई केली आहे. पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांनी यासाठी पाठपुरावा केला होता.
घटना क्रमांक १ : ऊसतोडणीच्या पैशांची खोटी लूट : अंगद अनंत खेडकर (रा. तरनळी, ता. केज) याने १३ जुलै रोजी केज पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली की, ऊस तोडणीसाठी घेऊन जात असलेले १ लाख ७५ हजार रुपये तिघा अनोळखी व्यक्तींनी शस्त्राचा धाक दाखवून लुटले. पोलिसांनी गंभीरतेने तपास सुरू केला, मात्र तांत्रिक पुरावे आणि घटनास्थळाच्या पाहणीतून असा कोणताही प्रकार घडला नसल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे खेडकर याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
घटना क्रमांक २ : अपहरणाचा बनावट कॉल : विठ्ठल श्रीहरी माळी (रा. मोरेवाडी, ता. अंबाजोगाई) याने 'डायल ११२' वर कॉल करून आपले अपहरण झाल्याचे आणि मारहाण करून डांबून ठेवल्याचे सांगितले. पोलिसांनी तातडीने त्याचे लोकेशन शोधून धारूर आणि अंबाजोगाई ग्रामीण पोलीस पथके पाठवली. मात्र, चौकशीत हा कॉल बनावट असल्याचे आणि पोलिसांना फसविल्याचे समोर आले. त्यामुळे माळी याच्यावर धारूर पोलीस ठाण्यात कारवाई करण्यात आली.
घटना क्रमांक ३ : ॲट्रॉसिटीचा खोटा दावा : सानप शास्त्री भोसले (रा. शेरी, ता. आष्टी) यांनी ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल व्हावा यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले. पोलिसांनी त्यांना तक्रार दाखल करण्यासाठी बोलावले असता, त्यांनी कोणतीही तक्रार नसल्याचे प्रतिज्ञापत्र सादर केले. तपासात हा प्रकार एका आर्थिक व्यवहारातून उद्भवला होता आणि पोलिसांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे स्पष्ट झाले.