बीड : येथील जिल्हा कारागृहामध्ये अधीक्षक पेट्रस गायकवाड यांच्यावर कैद्यांचे धर्मांतर करण्यासाठी प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप काही कैद्यांकडून झाल्यानंतर प्रशासकीय पातळीवर मोठी खळबळ उडाली आहे. या आरोपांच्या पार्श्वभूमीवर कारागृह उपमहानिरीक्षक यांच्या विशेष पथकाने शुक्रवारी सकाळीच बीडमध्ये येऊन पाच तास कसून चौकशी केली. यावेळी चाैकशीवरून दोन अधिकाऱ्यांमध्ये शाब्दिक खडाजंगी झाल्याचेही सूत्रांनी सांगितले.
जेलर गायकवाड यांनी तीन कैद्यांना विशिष्ट धार्मिक ग्रंथांचे वाचन करण्यास सांगणे, तसेच काही कैद्यांना प्रार्थना करण्यास भाग पाडणे, असे प्रकार केले असल्याचा आरोप आहे. या प्रकाराची तक्रार वरिष्ठांपर्यंत पोहोचल्यानंतर हे तपास पथक बीडमध्ये आले. पथकाने जेलर पेट्रस गायकवाड यांच्यासह तुरुंगातील तीन कैद्यांचे जबाब नोंदवले. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, पथकाने कारागृहातील संबंधित कैद्यांशी थेट संवाद साधून त्यांच्याकडून या आरोपांची सत्यता पडताळली. चौकशीदरम्यान खडाजंगी झाल्याचीही माहिती आहे. या गंभीर आरोपामुळे जेलर पेट्रस गायकवाड यांच्यावर कारवाईची टांगती तलवार आहे. चौकशी पथक आता या अहवालाच्या आधारे पुढील कार्यवाही करणार असून, या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता, प्रशासकीय स्तरावर मोठे बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जिल्हा कारागृहातील या घटनेमुळे बीडच्या प्रशासकीय वर्तुळात तणावाचे वातावरण आहे. दरम्यान, उपमहानिरीक्षक निती वायचाळ यांना संपर्क केला. परंतु त्यांनी फोन न घेतल्याने बाजू समजली नाही.
गायकवाड यांना कोणाचे अभय?पेट्रस गायकवाड हे विनापरवाना वृक्षतोड, कैद्याकडून वाहन धुवून घेणे अशा कारणांमुळे आगोदरच वादात सापडले होते. त्यानंतर आता त्यांच्यावर धर्मांतर करण्याचे आरोप झाले आहेत. असे असतानाही वरिष्ठ अधिकाऱ्यांचे पथक बीडमध्ये येऊन केवळ चौकशी करून जात आहे. परंतु पुढे याचे काय होते? हे समजत नाही. त्यामुळे गायकवाड यांना कोणाचे अभय आहे, असा सवाल उपस्थित होत आहे.