बीड : पाटोदा तालुक्यातील नायगाव घाटातील वळणावर एका हॉटेलसमोर मंगळवारी सांयकाळी पावणेआठच्या सुमारास रापमची बस आणि कारची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. यात कारचालक असलेला थेरला (ता. पाटोदा) येथील सरपंच पुत्र मोनू चंद्रकांत राख (वय २६) याचा जागीच मृत्यू झाला, तर विजय सानप (२९) आणि संघर्ष बांगर (२६) हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताची भीषणता इतकी होती की, कारचा चक्काचूर झाला, तर बस रस्त्याच्या खाली गेली.
अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. जखमी झालेले विजय आणि संघर्ष या दोघांना बीड शहरातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सध्या दोघांवरही उपचार सुरू आहेत आणि त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.