बीड जिल्ह्यातील शाळा सुरू; परंतु ८३ महाविद्यालये मात्र अद्यापही बंदच !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:27 IST2021-02-05T08:27:40+5:302021-02-05T08:27:40+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क बीड : बीड जिल्ह्यातील अनुदानित ४०, विनाअनुदानित ४२ आणि एक शासकीय महाविद्यालय आहे, अशी एकूण ८३ ...

Beed district schools open; But 83 colleges are still closed! | बीड जिल्ह्यातील शाळा सुरू; परंतु ८३ महाविद्यालये मात्र अद्यापही बंदच !

बीड जिल्ह्यातील शाळा सुरू; परंतु ८३ महाविद्यालये मात्र अद्यापही बंदच !

लोकमत न्यूज नेटवर्क

बीड : बीड जिल्ह्यातील अनुदानित ४०, विनाअनुदानित ४२ आणि एक शासकीय महाविद्यालय आहे, अशी एकूण ८३ महाविद्यालये कोरोना महामारीमुळे जवळपास एक वर्षापासून बंद आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील जवळपास १ लाख १० हजार विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

कोरोना महामारीचा सर्वच क्षेत्रांना फटका बसला आहे. शैक्षणिक क्षेत्रास त्याची अधिक झळ बसली आहे. दहा महिन्यांनंतर आताशी कुठे जिल्ह्यातील शाळा सुरू झाल्या असल्यातरी विद्यार्थ्यांची उपस्थिती अतिशय नगण्य आहे. शिकविणारे आणि शिकणारे दोघेही कोरोना भीतीच्या सावटाखाली आहेत.

महाविद्यालये सुरू झाली पाहिजेत, अशी असंख्य विद्यार्थ्यांची मागणी आहे. शिक्षणाविना घरी बसून तेदेखील कंटाळले आहेत. ग्रामीण भागातील बहुतांश गरीब विद्यार्थी हे शिक्षण घेत उपजीविकेसह आपल्या आई-वडिलांना आर्थिक हातभार लावतात. महाविद्यालये बंद असल्यामुळे हे विद्यार्थी आपापल्या गावी जाऊन बसल्यामुळे अनेक व्यावसायिकांना त्याचा फटका बसला आहे. त्यांची अडचण होत आहे.

मी सायन्सचा विद्यार्थी. जवळपास एक वर्षापासून महाविद्यालये बंद असल्यामुळे नैराश्य येत असून, शिक्षणातील गोडी दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. पाऊस असो की थंडी, मी कधीही काॅलेजला दांडी मारली नाही. शिकून मोठे होण्याचे माझे स्वप्न होते.

-राजेश देशमुख, बीड

कोरोना महामारीमुळे आमच्यासारख्या असंख्य विद्यार्थ्यांचे नुकसान झाले आहे. शिकण्याचा, काही तरी करण्याचा जो जोश होता, तो कमी होत चालला आहे. असेच जर चालू राहिले, तर अनेक विद्यार्थी शिक्षणापासून कोसो दूर जातील.

-सचिन पाटील, अंबाजोगाई

कोरोनामुळे शिक्षण बंद झाले. अनेक विद्यार्थी क्लासेस लावत आहेत. ऑनलाइन शिक्षण घेत आहेत. ज्यांच्याकडे सुविधा आहेत, त्यांचे ठीक आहे; परंतु हजारो विद्यार्थ्यांकडे सुविधा नाहीत त्यांचे काय? असा प्रश्न आहे. महाविद्यालये सुरू व्हावीत.

-अशोक कांबळे, माजलगाव

मी औरंगाबादला अभियांत्रिकेचे शिक्षण घेत आहे. महाविद्यालय बंद असल्यामुळे गावाकडेच आलो आहे. तांत्रिक शिक्षण असल्यामुळे त्यात इतका मोठा खंड पडणे योग्य नाही. त्याचा परिणाम निश्चितच गुणवत्तेवर होणार आहे, हेही तितकेच खरे.

-संतोष मुंडे, परळी

Web Title: Beed district schools open; But 83 colleges are still closed!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.