कोरोना लसीकरणात बीड जिल्हा तिसऱ्या क्रमांकावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:27 IST2021-02-05T08:27:09+5:302021-02-05T08:27:09+5:30
- फोटो बीड : जिल्हा आरोग्य विभागाने कोरोना लसीकरणात सलग तिसऱ्या दिवशी दबदबा कायम ठेवत राज्यात अव्वल स्थान पटकावले. ...

कोरोना लसीकरणात बीड जिल्हा तिसऱ्या क्रमांकावर
- फोटो
बीड : जिल्हा आरोग्य विभागाने कोरोना लसीकरणात सलग तिसऱ्या दिवशी दबदबा कायम ठेवत राज्यात अव्वल स्थान पटकावले. शुक्रवारीही १३१ टक्के लसीकरण करून पहिल्या क्रमांक पटकावला. तर सरासरी लसीकरणात बीडचा राज्यात तिसरा क्रमांक लागतो. सुरुवातीच्या चार दिवसांत कमी लसीकरण झाल्याने टक्का कमी राहिल्याचे सांगण्यात आले.
राज्यात १६ जानेवारीपासून कोरोना लसीकरणास सुरुवात झाली. बीड जिल्ह्यातही सुरुवातीला ५ केंद्रावर लस देण्यात आली. परंतु प्रतिसाद पाहून पुन्हा ती संख्या वाढवून ९ करण्यात आली. शुक्रवारी जिल्ह्यात १ हजार १८० लाभार्थ्यांना लस देण्यात आली. याचा टक्का १३१ एवढा होता. शुक्रवारी राज्यात बीड अव्वल होते. तर आतापर्यंत जिल्ह्यात ६ हजार ३७ लाभार्थ्यांना लस टोचण्यात आली आहे. याचा टक्का ९९ आहे. धुळे, अमरावती नंतर बीडचा तिसरा क्रमांक लागतो.
दरम्यान, सुरुवातीच्या काळात साइड इफेक्टच्या भीतीने लाभार्थी पुढे येत नव्हते. परंतु जसजसा विश्वास वाढत गेला, तसतसे लाभार्थीही वाढत गेले. आता जिल्हा रोज अव्वल राहत असल्याचे दिसते. मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर.बी. पवार, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सूर्यकांत गित्ते, नोडल ऑफिसर डॉ. संजय कदम, डॉ. बाबासाहेब ढाकणे यांच्यासह सर्व तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, लसीकरण पथकातील डॉक्टर, कर्मचारी हे यासाठी परिश्रम घेत आहेत.
दुसऱ्या टप्यात १५ हजार डोस
जिल्ह्याला पहिल्या टप्यात १७ हजार कोव्हीशिल्ड लसीचे डोस प्राप्त झाले होते. एका लाभार्थ्याला दोन वेळा लस दिली जाणार आहे. पहिली लस घेतल्यानंतर पुढील २८ दिवसानंतर दुसरी लस दिली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात किमान ८ हजार लाभार्थ्यांना ही लस पुरणार होती. आता दुसऱ्या टप्प्यातही १५ हजार ३०० डोस दोन दिवसांपूर्वीच जिल्ह्याला प्राप्त झाले आहेत. यातही जवळपास ७ ते ८ हजार लाभार्थ्यांना डोस मिळणार आहेत. तिसऱ्या टप्प्यातील डोस प्राप्त होण्याबाबत अद्याप आरोग्य विभागाकडे माहिती नाही.
कोट
जिल्ह्यात पहिल्या टप्यात १७ हजार तर दुसऱ्या टप्प्यात १५ हजार डोस प्राप्त झाले आहेत. एका लाभार्थ्याला दोन वेळा डोस दिला जाईल. आतापर्यंतच्या प्राप्त डोसमध्ये किमान ८० टक्के लाभार्थी पूर्ण होतील. उर्वरित तिसऱ्या टप्प्यात घेण्यात येतील.
डॉ. संजय कदम
नोडल ऑफिसर, कोरोना लसीकरण मोहीम
----
राज्यातील आकडा
धुळे १०८.७
अमरावती १०६
बीड ९९
वर्धा ९६.५
सातारा ९३.९
-----
जिल्ह्यातील केंद्रनिहाय शुक्रवारचे लसीकरण
बीड ९९६
परळी ८३१
आष्टी ९२०
पाटोदा ४४४
केज ३४४
अंबाजोगाई ८५१
माजलगाव ३६१
गेवराई ८०२
धारूर ४८६