राज्यातील गुन्हेगारीत लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून आले असून दिवसाढवळ्या हत्येच्या घटना घडू लागल्या आहेत. अशीच एक घटना बीडच्या माजलगावात घडली. बिलाच्या कारणावरून काही तरुणांनी ढाबा मालक आणि त्याच्या मुलाला बेदम मारहाण केली. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या बाप- लेकांवर रुग्णालयात उपचार सुरू होते. परंतु, उपचारादरम्यान, ढाबा मालकाचा मृत्यू झाला. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली असून बीड जिल्ह्यात कायदा सुव्यवस्था आहे का नाही? असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.
महादेव गायकवाड (वय, ५४) असे हत्या झालेल्या हॉटेल मालकाचे नाव आहे. महादेव यांचे माजलगाव शहरापासून ४ किमी अंतरावर नागडगाव पाटी कॉनर्रवर ढाबा आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी संध्याकाळी ७.३० वाजताच्या सुमारास काही तरूण त्यांचा ढाब्यावर जेवायला आले होते. जेवल्यानंतर बिलाच्या कारणावरून त्यांनी वाद महादेव यांचा मुलगा आशुतोष याच्याशी वाद घालायला सुरुवात केली. त्यानंतर हा वाद मिटण्याऐवजी इतका पेटला की, तरुणांनी आशुतोषला मारहाण करण्यास सुरुवात केली. मुलाच्या भांडणात मध्यस्ती करणाऱ्या महादेव यांनाही तरुणांनी मारहाण केली. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या महादेव आणि आशुतोष यांना उपचारासाठी संभाजीनगर येथील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र,उपचारदरम्यान महादेव यांचा मृत्यू झाला. तर, आशुतोष याच्यावर उपचार सुरू आहेत.
याप्रकरणी माजलगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणातील आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याची मागणी नातेवाईकांनी केली आहे. क्षुल्लक कारणांवरून एका ढाबा मालकाची हत्या करण्यात आल्यानंतर जिल्ह्यात एकच खळबळ माजली आहे.